रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेनेपाठोपाठ उद्धवसेनेचीही यादी जाहीर, सर्व विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात
By मनोज मुळ्ये | Published: October 24, 2024 12:21 PM2024-10-24T12:21:51+5:302024-10-24T12:23:01+5:30
युतीकडून गुहागरला कोण?
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली नसल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र शिंदे सेनेने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केलेल्या आपल्या पहिल्या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील चर्चा मात्र अजूनही सुरूच असल्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तोपर्यंत भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली होती. मात्र त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचेच नाव निश्चित असून, त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला आहे.
बुधवारी दुपारी राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश असून, चिपळूणसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. उद्धव सेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनाही पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला असल्याची माहिती साेशल मीडियावर फिरत आहे. मात्र त्यांच्या नावाबाबतही अधिकृत घोषणा झालेली नाही.
युतीकडून गुहागरला कोण?
मंगळवारी रात्री उशिरा शिंदे सेनेने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यात रत्नागिरीचे विद्यमान आमदार उदय सामंत, दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्यासह पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उद्योजक व सिंधुरत्न समितीचे निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या नावाचा समावेश आहे. चिपळूणचे जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) देण्यात आली आहे. उर्वरित गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव पहिल्या यादीत नाही. तेथे नुकतेच शिंदे सेनेत दाखल झालेले माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल हेच उमेदवार असण्याची शक्यता अधिक आहे.
उद्धवसेनेत जुने चेहरे नव्याने समोर
- शिंदे सेनेने जिल्ह्यातील उमेदवार देण्याबाबत आघाडी घेतली असली तरी महाविकास आघाडीच्या यादीची अद्याप प्रतीक्षाच आहे. महाविकास आघाडीकडून दापोलीत उद्धव सेनेचे संजय कदम, गुहागरला उद्धव सेनेचे भास्कर जाधव, चिपळूणला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत यादव आणि राजापुरात उद्धव सेनेचे राजन साळवी अशा नावांवर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. मात्र त्याबाबत अजून अधिकृत घोषणा नाही.
- उद्धव सेनेसाठी सर्वाधिक प्रतिष्ठेच्या असलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी अजूनही नावाची निश्चित झालेली नाही. भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवबंधन बांधून मशाल हाती घेतील आणि ते उद्धव सेनेचे उमेदवार असतील, अशी मोठी चर्चा आहे. मात्र उद्धव सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे या जागेचे नाव अजून जाहीर झालेले नाही.