मोदी, शाह यांची भाजप संघाला मान्य आहे का, उद्धव ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 02:26 PM2024-11-06T14:26:26+5:302024-11-06T14:27:27+5:30

भाजपच्या मतदारांनीही विचार करावा, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी घ्या, बतावणी नको

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Is Modi, Shah acceptable to BJP Rashtriya Swayamsevak Sangh Uddhav Thackeray question | मोदी, शाह यांची भाजप संघाला मान्य आहे का, उद्धव ठाकरेंचा सवाल

मोदी, शाह यांची भाजप संघाला मान्य आहे का, उद्धव ठाकरेंचा सवाल

रत्नागिरी : ज्यांनी भाजप रुजवला ते लोक आता नको आहेत. भाजपचे अध्यक्ष नड्डा सांगतात की, आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही. मोदी आणि शाह यांचा हा नवा भाजप संघाला मान्य आहे का, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना मान्य आहे का, असा प्रश्न उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केला. भाजपच्या मतदारांनीही हा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

उद्धवसेनेचे रत्नागिरीतील उमेदवार बाळ माने, राजापुरातील उमेदवार राजन साळवी यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप तसेच मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली.

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, रमेश कदम, हुस्नबानू खलिफे, महाविकास आघाडीचे चिपळूणचे उमेदवार प्रशांत यादव, बशीर मुर्तुझा, मिलिंद कीर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात दोन भाऊ निवडणूक लढवत आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन भाऊ आणि त्यांचे वडील राजकारणात आहेत. त्यावर कोणी बोलत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मंत्री सामंत यांच्यावरही त्यांनी टीका केली. २०१४ साली आयत्या वेळी भाजपने युती होणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी, असा प्रश्न होता. त्यावेळी उदय सामंत आमच्याकडे आले आणि त्यांना उमेदवारी देऊन मी चूक केली. त्यांना मंत्री बनवण्याचा शब्द दिला आणि तो आपण पाळलाही. मात्र, तरीही ते आपल्याला सोडून गेले, असा आरोप त्यांनी केला.

आताची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे, असे सांगताना त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी धोरणांची घोषणा केली. शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षितता, धान्याचे स्थिर भाव याबाबत त्यांनी विस्ताराने माहिती केली.

सुरुवातीला उद्धवसेनेचे मंगेश साळवी, राष्ट्रवादीचे मिलिंद कीर, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने यांची भाषणे झाली.

बारसू रिफायनरी प्रकल्प हद्दपार करणार

जर आपली सत्ता आली तर बारसू रिफायनरी हद्दपार केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले. हा प्रकल्प चांगला असल्याचे चित्र आपल्यासमोर निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे बारसू येथील जागेचा पर्याय आपण पुढे केला. मात्र, जर तो प्रकल्प जनतेला नको असेल तर तो हद्दपार करू, असे ते म्हणाले.

सुनावणी घ्या, बतावणी नको

सर्वोच्च न्यायालयासमोर ८ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. अडीच वर्षे हे सर्व सुरू आहे. आता न्यायालयाने सुनावणी घ्यावी, बनावणी नको, असेही ते थेट म्हणाले. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली आहे. आता तरी न्यायदेवतेला सर्व काही दिसेल, अशी आपल्याला आशा आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Is Modi, Shah acceptable to BJP Rashtriya Swayamsevak Sangh Uddhav Thackeray question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.