राजापूरमध्ये बंडखोर उमेदवाराचा फायदा कोणाला ?, प्रमुख लढत दोन शिवसेनांमध्येच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:07 PM2024-11-14T17:07:12+5:302024-11-14T17:08:36+5:30
काँग्रेसच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी केलेली बंडखोरी हा कळीचा मुद्दा
राजापूर : सलग २९ वर्षे राजापूर विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या शिवसेनेतील फुटीमुळे यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. अर्थात, काँग्रेसच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी केलेली बंडखोरी हा या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. या बंडखोरीचा परिणाम इतर कोणत्या पक्षावर होणार, दोन प्रमुख पक्षांच्या लढतीत बंडखोर उमेदवाराला किती वाटा मिळणार, हे पाहणे रंगतदार होणार आहे.
मागील तीन निवडणुकांमध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आमदार राजन साळवी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारली होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस त्यांच्यासोबत असली, तरी यावेळी त्यांना शिवसेनेचाच सामना करावा लागणार आहे. त्याच वेळी सोबत असलेल्या काँग्रेसशीही त्यांना सामना करावा लागणार आहे.
उद्धवसेनेच्या विरोधात येथे महायुतीकडून शिंदेसेनेचे किरण सामंत निवडणूक लढवत आहेत. ते प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरले असले, तरी २००४ पसून उदय सामंत यांच्या प्रत्येक निवडणुकीचा त्यांना अनुभव आहे. उद्धवसेनेचे आमदार राजन साळवी २००५ पासून या मतदारसंघात कार्यरत आहेत. पहिल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, २००९, १४ आणि १९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये ते विजयी झाले. हा अनुभव त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरणारा आहे.
मागील निवडणुकीत आमदार साळवी यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यावेळी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी कोणासाठी फायदेशीर ठरणार आणि त्यांच्या उमेदवारीचा कोणाला तोटा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात, त्यांच्या उमेदवारीचा कोणाला फायदा तोटा होणार की, ते आणखी काही वेगळे चित्र उभे राहणार, हे मतदारच ठरवतील आणि त्यालाही आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही.
- लाेकसभा निवडणुकीपासून मतदारसंघातील गावागावात केलेला दौरा किरण सामंत यांचे बलस्थान ठरणार आहे.
- १५ वर्षांत मतदारसंघाशी असलेला संपर्क हे राजन साळवी यांच्यासाठी बलस्थान आहे.
- अविनाश लाड यांची उमेदवारी हा या मतदारसंघातील सर्वाधिक कळीचा मुद्दा ठरणार आहे.