त्रिकुटामुळे महाराष्ट्र गुजरातपुढे नतमस्तक, जयंत पाटील यांचे टीकास्त्र

By संदीप बांद्रे | Published: November 8, 2024 05:28 PM2024-11-08T17:28:59+5:302024-11-08T17:31:19+5:30

मोदींच्या खोट्या योजनांनी जनतेला फसवले

Maharashtra bows down to Gujarat due to Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Ajit Pawar Criticism by Jayant Patil | त्रिकुटामुळे महाराष्ट्र गुजरातपुढे नतमस्तक, जयंत पाटील यांचे टीकास्त्र

त्रिकुटामुळे महाराष्ट्र गुजरातपुढे नतमस्तक, जयंत पाटील यांचे टीकास्त्र

चिपळूण : महाराष्ट्रातले १७ मोठे प्रकल्प गुजरातमध्ये  गेले, अनेक महत्वाचे कार्यालये स्थलांतरित केली. लाखो तरुणांचा रोजगार पळवला, तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे त्रिकुट एक शब्द देखील काढायला तयार नाही. मोदी आणि शहा समोर ते नतमस्तक झाले आहेत. महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला आहे. त्यातून महाराष्ट्राची अधोगती सुरु झाली आहे. दरडोई उत्पन्नातही घसरले आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. प्रत्येक पातळीवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे महायुती सरकारचे वाभाडे काढत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्याचे आवाहन केले.

चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ चिपळूण शहरातील इंदिरा गांधी संस्कृतीक केंद्रासमोरील मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करण्यासाठी माजी मंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. सभेत जयंत पाटील यांनी पक्षफुटी तसेच भाजपवर जोरदार निशाणा साधला.

ते म्हणाले की, आधी ज्यांनी घोटाळे केले तेच आज भाजप बरोबर सरकारमध्ये मंत्री बनले आहेत. नवाब मलिक यांच्यावर चक्क देशद्रोहाचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तेच नवाब मलिक आज भाजप महायुतीचे उमेदवार आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या मुलीला देखील महायुतीने उमेदवारी दिली आहे. एकवर एक फ्री योजना सुरू आहे. म्हणजेच खोटेनाटे आरोप करायचे, जेलमध्ये टाकायचे, नंतर त्यांना बाहेर काढून आपल्या पक्षाकडे घ्यायचे ही भाजपचे सत्तेचे समीकरण राहिले आहे, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला. 

छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीचा दाखला देत जयंत पाटील म्हणाले छगन भुजबळ स्वतः म्हणालेत की, आम्हाला भाजप बरोबर जावे लागले. जर गेलो नसतो, तर आमच्यावर ईडी, इन्कमटॅक्स असे विविध कारवाई झाली असती आणि जेलमध्ये बसावे लागले असते. पुन्हा जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती. तेव्हा या कारवाया टाळण्यासाठी आम्हाला जावे लागले. जे जे भाजप बरोबर गेले त्यांच्यावर कारवाई होणार होती. त्याभीती पोटी ते लोक चक्क भापला शरण गेले, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

महागाई, बेरोजगारीने उच्चांक गाठला 

मी राज्याचा अर्थमंत्री असताना महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न देशाच्या तुलनेत १५ टक्के होते. आता ते १३ टक्क्यांवर आले आहे. दोन टक्के दरडोई उत्पन्न घटने म्हणजे लाखों कोटी रुपये उत्पन्न घटले आहे. जे स्वतः महाराष्ट्राचे उत्पन्न होते त्यामध्ये झालेली घट ही गंभीर आहे. महागाई आणि बेरोजगारीने तर महाराष्ट्रात उच्चांक गाठला आहे. महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. तरी देखील सरकार ढिम्म आहे, असा थेट आरोप देखील यावेळी जयंत पाटील यांनी केला.

Web Title: Maharashtra bows down to Gujarat due to Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Ajit Pawar Criticism by Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.