२०१९ मध्येही सगळे पालापाचोळ्यासारखे उडून गेले, एकटे मोदीच सगळ्यांवर भारी : एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 02:43 PM2023-05-25T14:43:13+5:302023-05-25T14:43:50+5:30
भारत हा पुढे जातोय. भारत महासत्तेकडे जातोय. याचीच पोटदुखी सुरू असल्याचं म्हणत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात विरोधक एकत्र येताना दिसत आहे. नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, या सर्व भेटींवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. रत्नागिरी दौऱ्यात पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केला.
“यापूर्वीही सगळे विरोधी पक्ष एकत्र आले होते. लोकशाहीत सर्वांना भेटण्याचा, एकत्र येण्याचा अधिकार आहे. परंतु शेवटी मतदान जनता करते. गेल्यावेळचा अनुभव आपल्याकडे आहे. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली अधिक जागा मिळाल्या,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“त्यावेळचा माहोल आपण पाहिला आहे. हे सगळे पालापाचोळ्यासारखे उडून गेले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमत आलं. त्यांचं काम बोलतं. हे कितीही एकत्र आले तरी एकटे मोदी सर्वांवर भारी आहेत. त्यांच्याकामामुळे ते भारी आहेत. संपूर्ण जगात देशाचं नाव मोठं करण्याचं काम त्यांनी केलं आहे. इतर देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना, देशाची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर आणण्याचं काम मोदींनी केलं. भारत हा पुढे जातोय. भारत महासत्तेकडे जातोय. याचीच पोटदुखी सुरू आहे. याचा जनतेच्या मनावर परिणाम होत नाही. जेवढं मोदींच्या विरोधात बोलतील, विरोधी पक्ष एकत्र येतील तेवढी जनता त्यांना त्यांची जागा २०२४ मध्ये ताकदीनं दाखवतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पटोलेंना टोला
नाना पटोलेंचाही भावी मुख्यमंत्री असा बॅनर लागला आहे असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. "हे चांगलंच आहे. प्रत्यक्ष नाही तर बोर्डावर तर लागतो. त्यांच्यात चढाओढ सुरू आहे. त्यांना आनंद घेऊ द्या. एक उमेदवार आधी निश्चित केला पाहिजे. उमेदवारांपासूनच मारामारी आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार घरी झोपलं होतं, घरी बसलं होतं, मग जनता कोणाच्या बाजूनं उभी राहिलं," असं शिंदे म्हणाले.