महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात, पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 06:32 PM2023-04-25T18:32:21+5:302023-04-25T18:32:46+5:30
हे आमचे दुर्दैव
रत्नागिरी : महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरीत होत असून, तो मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून होत आहे. हा प्रकल्प झाल्यावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांचे वीजबिल शून्य होणार आहे. हा निर्णय ऐतिहासिक आहे की नाही, तो ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ठरवावा. त्यासाठी आठ कोटी रुपये जिल्हा नियोजनातून देणार आहे. त्यापैकी ३ कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग केले आहेत, असे अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ अंतर्गत जिल्हास्तरीय व जिल्हा परिषद गटस्तरीय ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. महाराष्ट्राच्या इतिहासात नियोजन मंडळाकडून ग्रामीण भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांचे टॅलेंट सर्च करून मुलांना अमेरिकेला पाठवण्याचे धाडस रत्नागिरी जिल्हा परिषद व नियोजन मंडळाने केले. शेतकऱ्यांची मुले इस्रो, नासाला पाठविण्याचे काम जिल्हा परिषदेने करून रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला ठरला, असेही ते म्हणाले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
सरपंच आणि ग्रामसेवक ही गाडीची दोन चाके आहेत. ती विश्वासाने चालली पाहिजेत. दोघांनी एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. गावचा विकास व्हायचा असेल तरी शासनाने ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण अधिकार महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत. या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा उपयोग आपण ग्रामपातळीवर कसा करतो, हे भविष्यातील प्रश्नचिन्ह राहणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. ग्रामपंचायतींना लागेल तेवढा निधी आणि इन्फ्रास्ट्रक्चर देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व अन्य उपस्थित होते.
हे आमचे दुर्दैव
अब्दुल सत्तार गुवाहटीला गेल्याने कृषिमंत्री झाले आणि मी गुवाहटीला गेल्याने उद्योगमंत्री झालो. त्यानंतर मी या जिल्ह्याचा साडेसात वर्षानंतर पालकमंत्री झालो. साडेसात वर्षे स्थानिक पालकमंत्री दिला नाही, हे आमचे दुर्दैव आहे, अशी खंत पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केली.