महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संगमेश्वर शाखेतर्फे पूरग्रस्तांना सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:30 AM2021-07-29T04:30:57+5:302021-07-29T04:30:57+5:30
रत्नागिरी : चिपळूण, कळंबस्ते येथील पूरपरिस्थितीत अडकलेल्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी शिक्षक परिषद संगमेश्वर शाखेने निधी वितरित केला. ...
रत्नागिरी : चिपळूण, कळंबस्ते येथील पूरपरिस्थितीत अडकलेल्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी शिक्षक परिषद संगमेश्वर शाखेने निधी वितरित केला. ज्ञानदानाबरोबर सामाजिक संवेदनेची जाणीव ठेवत शिक्षकांनी हे कार्य केले.
तालुकाध्यक्ष अनंतकुमार मोघे, मधुकर कोकणी, मंगेश गुरव, शिवराज कांबळे यांनी सर्व तालुक्यात ठिकठिकाणी फिरून निधी संकलन केले. तालुक्यातील अनेक शिक्षकांनी मदतीच्या हाकेला उत्तम प्रतिसाद देऊन निधी संकलन केले. या निधीतून ५० शिधा पॅकेट, ५० कपड्यांची पॅकेट, ५० फरसाण पॅकेट तयार करून चिपळूणजवळील कळंबस्ते या गावात त्यांचे वितरण करण्यात आले. कळंबस्ते गावचे सरपंच अरूण भुवड, जनकल्याण समितीचे कार्यकर्ते विठ्ठल कुलकर्णी, प्रकाश परब यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले.
कळंबस्ते गावातील पूरग्रस्त नागरिकांना वाटपासाठी कार्याध्यक्ष किरण देशपांडे, तालुकाध्यक्ष अनंतकुमार मोघे, कार्यकारिणी सदस्य गुरव, ठाकरे, बारामते यांनी सहकार्य केले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गोंधळ न होता प्रत्येक नागरिकाला शिधा, कपडे, बिस्किट, पाणी यांचे वाटप केले गेले. काही कॉलनीमध्ये प्रत्यक्ष जाऊन वाटप केले.
या सेवाकार्यासाठी विभागीय अध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्याध्यक्ष किरण देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हाध्यक्ष एस. एस.पाटील, जिल्हा कार्यवाह पी. एम. पाटील, जीवन पाटील, जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष महेश नवले, सहकारी शिक्षक दात्ये व सामाजिक कार्यकर्त्या नेहा जोशी यांचेही सहकार्य लाभले.
फोटो मजकूर
चिपळूण, कळंबस्ते येथील पूरपरिस्थितीत अडकलेल्या कुटुंबांना शिक्षक परिषद संगमेश्वर शाखेने निधी संकलन करून त्यातून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.