महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची पहिली राज्य कोअर कमिटी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:49+5:302021-06-04T04:23:49+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात ‘मासू’ या अराजकीय विद्यार्थी संघटनेची पहिली राज्य कोअर कमिटी जाहीर झाली आहे. यात ...
रत्नागिरी : महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात ‘मासू’ या अराजकीय विद्यार्थी संघटनेची पहिली राज्य कोअर कमिटी जाहीर झाली आहे. यात कोकण प्रदेशचे अॅड. गौरव देवेंद्र शेलार यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांचे न्याय हक्क आणि अधिकारांच्या पूर्ततेसाठी न्यायिक स्वरुपाचा लढा देण्याचं काम मासू करत असून, या लढ्याला व्यापक स्वरूप प्रदान करण्यासाठी तसेच संघटनेतील सदस्यांना निर्णय प्रकियेमध्ये सामील करून घेण्यासाठी संस्थापक अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार राज्य कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्याकरिता राज्यभरातून पहिल्या कोअर कमिटीसाठी ७ सभासदांची निवड संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष अॅड. सुनील देवरे आणि उपाध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केली आहे. संस्थापक अध्यक्ष व कार्याध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या इतर सभासदांच्या सहमतीने ही कमिटी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य कोअर कमिटी सभासद शोधण्याची जबाबदारी संघटनेचे सचिव अरुण चव्हाण आणि राज्य संघटक सिद्धार्थ तेजाळे यांच्यावर सोपविण्यात आलेली होती. याकरिता सभासदांची कार्यक्षमता, विचार, आचार, संघटन कौशल्य व योग्यता ध्यानात घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. यापुढे ही कमिटी वृद्धिंगत होणार असून, इतर सभासदांना त्यांच्या कामाच्या आधारावर राज्य कोअर कमिटीमध्ये सामील होण्याची संधी प्राप्त होणार आहे.
पहिल्या राज्य कोअर कमिटीत समावेश असलेले सात सदस्य असे : अॅड. गौरव शेलार (कोकण प्रदेश), प्रा. मो. वाजिद मोहम्मद इब्राहिम शेख (नांदेड विभाग, मराठवाडा), रोहन महाजन (जळगाव, उत्तर महाराष्ट्र), अॅड. करिष्मा अन्सारी (भिवंडी तालुका), चेतन विलास वासाडे (चंद्रपूर विभाग, विदर्भ), अॅड. स्नेहल निकाळे (मुंबई प्रदेश), परेश चौधरी (ठाणे जिल्हा).