ओझरमध्ये महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद, रत्नागिरी जिल्ह्यातील २३ मंदिरांतील प्रतिनिधी सहभागी होणार

By शोभना कांबळे | Published: November 30, 2023 05:52 PM2023-11-30T17:52:41+5:302023-11-30T17:55:39+5:30

परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून अधिक निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक सहभागी होणार

Maharashtra Temple Trust Council in Ozar, Representatives from 23 temples of Ratnagiri district will participate | ओझरमध्ये महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद, रत्नागिरी जिल्ह्यातील २३ मंदिरांतील प्रतिनिधी सहभागी होणार

ओझरमध्ये महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद, रत्नागिरी जिल्ह्यातील २३ मंदिरांतील प्रतिनिधी सहभागी होणार

रत्नागिरी : पुणे येथील श्री विघ्नहर सभागृहात २ व ३ डिसेंबर रोजी द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे'त रत्नागिरी जिल्ह्यातील २३ मंदिरांचे विश्वस्त व सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संजय जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मंदिरांतील पावित्र्याचे रक्षण करणे, प्राचीन मंदिर-संस्कृतीचे संवर्धन करणे, मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे, मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगांचे सुनियोजन करणे, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यादृष्टीने श्री विघ्नहर गणपती मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपती मंदिर देवस्थान, श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून अधिक निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक सहभागी होणार आहेत. यात रत्नागिरी जिल्ह्यातील २३ मंदिरांचे ३६ विश्वस्त आणि सदस्य सहभागी होणार आहेत. यावेळी श्री गणपती पंचायतन मंदिर केळ्ये, (ता. रत्नागिरी)चे सुनील सहस्रबुद्धे, हिंदू जनजागृती समितीचे विनोद गादीकर, स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर देवस्थान राजिवडा (रत्नागिरी)चे देवेंद्र झापडेकर, श्री विठ्ठल रखमाई मंदिर कुवारबाव (रत्नागिरी)चे मंगेश राऊत उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यातून श्रीदेव गणपतीपुळे, राजापूर तालुक्यातील श्री महाकाली मंदिर-आडिवरे, श्री कनकादित्य मंदिर-कशेळी, श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान-राजिवडा, रत्नागिरी, संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थान-चिपळूण, श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट-मजरे-दादर (ता. चिपळूण), खेड तालुका वारकरी भाविक संप्रदाय मठ, भरणे (ता. खेड), श्री दुर्गादेवी देवस्थान-मुरुड (ता. दापोली) या प्रसिद्ध मंदिरांचे विश्वस्त आणि सदस्य, तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे सहभागी होणार आहेत.

या परिषदेत मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे, मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे, वक्फ कायद्याद्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णाेद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

Web Title: Maharashtra Temple Trust Council in Ozar, Representatives from 23 temples of Ratnagiri district will participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.