महाराष्ट्रापासून विदर्भ तोडू देणार नाही
By admin | Published: January 22, 2016 01:13 AM2016-01-22T01:13:17+5:302016-01-22T01:13:28+5:30
रामदास कदम : सहजीवन शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव
खेड : महाराष्ट्रातील एकूण सिंचनापैकी २० टक्के सिंचन कोकणात होत असले तरीही कोकणाचाच भकास होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कोयनेचे पाणी कोकणातच राहणार, ते मुंबईत जाऊ देणार नाही, असा निर्धारही बोलून दाखवला. दुष्काळग्रस्त विदर्भात आपण लक्ष घातले असून, कोणत्याही परिस्थितीत विदर्भ महाराष्ट्रापासून तोडू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़
खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवाप्रसंगी विविध उपक्रमांच्या उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून पर्यावरणमंत्री रामदास कदम बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते संस्थेच्या आयटी सेंटरचे उद्घाटन, रामदास कदम यांच्याहस्ते संस्थेच्या इनडोअर ट्रेनिंग सेंटरचे आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी माजी आमदार निशिकांत जोशी होते. आमदार निरंजन डावखरे, कराडचे आमदार आनंद पाटील, विजय मेहता, रमा भोसले, सतीश भोसले, मनसेचे वैभव खेडेकर, योगेश कदम आणि रामचंद्र दळवी उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संस्थेच्या कार्यअहवालाचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. कराड -चिपळूण हा मार्ग रेल्वेने जोडण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्याने आणि विशेषत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकणातीलच असल्याने हा मार्ग पूर्णत्त्वास जाईल, असे ते म्हणाले. या प्रकल्पासाठी आमच्या सरकारने ५० टक्के रकमेची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)