रत्नागिरीतील महावितरणची यंत्रणा पावसामुळे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 05:49 PM2017-07-22T17:49:04+5:302017-07-22T17:49:04+5:30

१३ हजार ९०३ ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प

The Mahavitaran system of Ratnagiri was disrupted due to the rains | रत्नागिरीतील महावितरणची यंत्रणा पावसामुळे विस्कळीत

रत्नागिरीतील महावितरणची यंत्रणा पावसामुळे विस्कळीत

Next

 आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. २२ : तीन दिवस संततधार बरसणाऱ्या पावसाने वारे व मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ११ केव्हीच्या वाहिन्या नादुरूस्त झाल्यामुळे १३ हजार ९०३ ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. महावितरणच्या यंत्रणेला ५ हजार ८०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले असले तरी ८ हजार १०३ ग्राहक अजूनही अंधारात आहेत.

कोतवडे येथील ११ केव्हीची वाहिनी सकाळी ९.४९ वाजता बंद पडली होती. दुपारी ३ वाजता ती सुरळीत करण्यात आल्यामुळे परिसरातील ४ हजार ग्राहकांना दिलासा मिळाला. संगमेश्वर येथील धामणी वाहिनी सकाळी ७.४५ वाजता ठप्प झाली. मात्र, ९.२५ वाजता दुरूस्त करण्यात आली. त्यामुळे ८०० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.

मार्गताम्हाणे येथील वाहिनी सकाळी ७.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत बंद होती. लोटे येथील ११ केव्ही वाहिनी सकाळी ७.१० वाजता बंद पडल्यामुळे दोन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. लोटे येथील दुसरी ११ केव्हीची वाहिनीही ७.१० वाजताच बंद पडली. त्यामुळे ६०३ ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे.

राजापूर तालुक्यातील धारतळे येथील वाहिनी सकाळी १०.५५ वाजता बंद पडल्यामुळे ७०० ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. नाटे वाहिनी दुपारी १.२५ वाजल्यापासून बंद असल्यामुळे ३५०० ग्राहकांना विजेशिवाय राहावे लागले. दापोली तालुक्यातील वणौशी गावातील ११ केव्ही वाहिनी संध्याकाळी ४ वाजता नादुरूस्त झाल्यामुळे १३०० ग्राहकांचा वीजपुरवठा अद्याप बंद आहे. एकूण ८ हजार १०३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

बीएसएनएलचा बोजवारा

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात गेले पाच दिवस बीएसएनएलची सेवा पूर्णपणे खंडित झाली आहे. त्यामुळे परिसरातील ४० गावांना याचा फटका बसला असून, संपर्क तुटला आहे. मागील काही महिने सातत्याने या सेवेत व्यत्यय येत आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या अनागोंदी व ढिसाळ कारभाराबाबत जनतेमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. ही सेवा तातडीने सुरु न झाल्यास शिवसेना कायदा हातात घेऊन सेना स्टाईलने आंदोलन छेडेल, असा इशारा माजी जिल्हा उपप्रमुख अशोक सक्रे यांनी दिला आहे.

गेल्या शुक्रवारी पाचलमधील बीएसएनएलच्या टॉवरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने परिसरातील सेवा पूर्णत: खंडित झाली आहे. असे प्रकार सातत्याने घडत आहेत. खंडित सेवेमुळे संपर्कासह इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्याचा मोठा फटका ४० गावातील ग्राहकांना बसत आहे. मागील पाच दिवसात ही सेवा पूर्ववत करण्यास अधिकाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. बीएसएनएलची सेवा तातडीने सुरळीत न केल्यास शिवसेना कायदा हातात घेऊन सेना स्टाईलने आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख अशाक सक्रे यांनी दिला आहे.

लांजात वादळी वाऱ्याने लाखोंचे नुकसान

लांजा : गेले तीन दिवस पडलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी या पावसाने मोठी हानी केली आहे. दरम्यान, पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तालुक्यात गेले दोन दिवसांत विविध ठिकाणी पडझड झाली आहे. तालुक्यातील गवाणे गावाला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आहे. याठिकाणी अनेकांचे नुकसान झाले आहे.

तुकाराम देऊ रेवाळे यांचे घर कोसळून अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. सुलोचना दत्ताराम गुरव यांच्या घरावर झाड कोसळून वीस हजारांचे नुकसान झाले आहे. भिकाजी सखाराम करंबेळे, गणपत गोविंद करंबेळे, रत्नू करंबेळे, सिताराम करंबेळे, सुरेश मोहिते, विठ्ठल रेवाळे, बाळकृष्ण माटल, दत्ताराम माटल, सीताराम कांबळे, गणपत करंबेळे यांच्या घरांच्या छपराचे नुकसान झाले आहे.या सर्व नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून इतरही अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

Web Title: The Mahavitaran system of Ratnagiri was disrupted due to the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.