तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ‘महावितरण’ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:24+5:302021-05-20T04:34:24+5:30

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरण विभागाला बसला असून, वादळ होऊन तीन दिवस उलटले तरी राजापूर तालुक्याच्या काही ...

Mahavitaran was hit the hardest by the cyclone | तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ‘महावितरण’ला

तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ‘महावितरण’ला

Next

राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरण विभागाला बसला असून, वादळ होऊन तीन दिवस उलटले तरी राजापूर तालुक्याच्या काही भागांत अजूनही ठप्प झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू झालेला नाही. महावितरणकडून हा पुरवठा पूर्ववत सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काही भागांत अंधाराचे साम्राज्य असून, विजेवर अवलंबून असलेली सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात अद्यापही २५ ते ३० टक्के ग्राहक अंधारात आहेत.

तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावांना बसला, तसा तालुक्याच्या अन्य भागांतही वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे विद्युत खांब, वीजवाहिन्या कोसळून महावितरणची वितरण व्यवस्था कोलमडून पडली. मुख्य वाहिनी ३३ केव्हीवरचाही वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. मुख्य वाहिनीतील अडथळे दूर करून ती पूर्ववत सुरू करण्यात आली असली तरी तालुक्यात अनेक भागांत कोसळून पडलेले खांब, वाहिन्या जोडण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. तालुक्यात आंबोळगड, जैतापूर, दळे, माडबन, साखरीनाटे, धाऊलवल्ली, कशेळी, धारतळे, ससाळे, शिळ, पाचल परिसरांतील काही भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित आहे.

ठेकेदाराकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने काम संथगतीने सुरू असून, महावितरणकडून सर्व ठिकाणी आपल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांमार्फत शर्थीचे प्रयत्न करून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Web Title: Mahavitaran was hit the hardest by the cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.