राजकारणाच्या मैदानात, मैदानावरून राजकारण; मोक्याच्या मैदानांचे बुकिंग
By मनोज मुळ्ये | Published: May 3, 2024 08:09 PM2024-05-03T20:09:34+5:302024-05-03T20:10:14+5:30
महायुतीने रत्नागिरीत एक मैदान तब्बल दहा ते पंधरा दिवस आपल्याच ताब्यात ठेवले
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : जाहीरसभेसाठी आपल्या पक्षाला मोक्याचे ठिकाण मिळावे, यासाठी जितके प्रयत्न केले जातात, तितकेच प्रयत्न आपल्या विरोधकांना मोक्याचे मैदान मिळू नये, यासाठीही केले जातात. यातूनच महायुतीने एक मैदान तब्बल दहा ते पंधरा दिवस आपल्याच ताब्यात ठेवले आहे. केवळ ताब्यात ठेवले नाही तर तेथील मंडपही कायम ठेवण्यात आला आहे. याखेरीज रत्नागिरी शहरातील अन्य मैदानांबाबतही महायुतीने महाविकास आघाडीच्या एक पाऊल पुढे टाकले आहे.
विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये जाहीर प्रचारसभेला खूप महत्त्व आहे. राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या, त्यातही स्टार नेत्यांच्या सभा पदरात पाडून घेणे यासाठी प्रत्येक उमेदवार धडपडत असतो. अशा सभांचा लोकांवर परिणाम होतो. सभा घेणारा नेता जितका प्रसिद्ध, तेवढी त्याला मागणी अधिक. अर्थात केवळ वक्ता चांगला एवढाच निकष पुरेसा होत नाही. सभा कोठे घेणार, यालाही महत्त्व असते.
त्यामुळे सभेचे ठिकाण लोकांसाठी सोयीस्कर हवे, पार्किंगची व्यवस्था नीट करता यावी अशा कारणांसाठी सोयीचे मैदान मिळवण्यावर राजकीय पक्षांचा भर असतो. स्वत:ला मैदान मिळावे आणि विरोधकाला मैदान मिळू नये, यासाठीच्या हालचालीही आवर्जून केल्या जातात. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयासमोरील जवाहर मैदान, शिर्के प्रशालेसमोरील मैदान महायुतीने आधीच ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सभा जलतरण तलावाशेजारील मैदानात घेण्यात आली.
जवाहर मैदान
सर्वप्रथम ठरल्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दि. २४ एप्रिल रोजी रत्नागिरीत जाहीरसभा होणार होती. त्यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जवाहर मैदानावर मंडपही घालण्यात आला. मात्र हवामानाच्या कारणास्तव हा दौरा स्थगित झाला. आता ही सभा शुक्रवार, दि. ३ मे रोजी त्याच ठिकाणी होणार आहे. मात्र २४ एप्रिलपासून मंडप त्याचजागी आहे. तो काढण्यात आलेला नाही. इतके दिवस हे मैदान महायुतीकडेच आहे.
शिर्के प्रशाला मैदान
रत्नागिरीतील शिर्के प्रशालेचे मैदानही मध्यवर्ती ठिकाणी आहे. या मैदानावरही महायुतीच्या सभा झाल्या आहेत आणि ते त्यांच्याच ताब्यात आहे.
चंपक मैदान
रत्नागिरी शहरालगतच्या उद्यमनगर परिसरातील चंपक मैदान हे सर्वात मोठे मैदान आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. या मैदानाची क्षमता खूपच मोठी आहे. मात्र या मैदानाला लागूनच मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या भागात खूप मोठी धूळ उडते. म्हणून राजकीय पक्षांनी यंदा चंपक मैदानाकडे पाठ फिरवली आहे. अर्थात या मैदानावर सभा घ्यायची झाल्यास तेवढी गर्दी व्हावी लागते. यासाठीही या मैदानाचा विचार झाला नसावा, अशी चर्चा आहे.
प्रमोद महाजन क्रीडा संकुलही आरक्षित
शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलही सभांसाठी उत्तम आहे. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी या मैदानाचा विचार सुरू होता. मात्र हे मैदान आयपीएलचे सामने दाखवण्यासाठी आधीच आरक्षित झाले होते. दरवर्षी आयपीएलचे उपांत्य आणि अंतिम एवढेच सामने थेट प्रक्षेपित केले जातात. मात्र यंदा आधीपासूनच ते दाखवले जात आहेत. यावरूनही चर्चा रंगत आहेत.