महायुतीत ‘महा’फूट
By admin | Published: July 19, 2014 11:37 PM2014-07-19T23:37:36+5:302014-07-19T23:51:09+5:30
रत्नागिरी पालिका : महायुतीच्या सत्तेला बंडखोरीचे ग्रहण लागणार?
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत भाजपाच्या नगरसेवकांमध्ये उभी फूट पडल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला वेगळीच कलाटणी लागली आहे़ या फुटीमुळे भाजपाच्या सहा नगरसेवकांनी वेगळ्या गटाची स्थापना केली आहे़
रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीने विद्यमान नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनाच पुन्हा संधी दिली आहे़ त्यासाठी मुंबईत शिवसेनेबरोबर भाजपाच्या नेत्यांनी वाटाघाटी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अशोक मयेकर यांना आणखी सहा महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने महायुतीतर्फे त्यांनाच उमेदवारी देण्यात आली़
अशोक मयेकर यांना पुन्हा नगराध्यक्षपद देण्याबाबत भाजपाच्या ६ नगरसेवकांकडून तीव्र विरोध होता़ त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी आज आपला वेगळा गट तयार केला़ त्यासाठी या नगरसेवकांनी एक बैठक घेऊन नगरसेवक महेंद्र मयेकर यांना गटप्रमुख म्हणून नियुक्त केले़ त्यानंतर महेंद्र मयेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला़ आज सायंकाळी उशिरा भाजपाच्या नगरसेविका संपदा तळेकर, सुप्रिया रसाळ, प्रज्ञा भिडे, दिपा आगाशे, पल्लवी पाटील आणि नगरसेवक महेंद्र मयेकर यांनी वेगळा गट केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले़ त्यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे़ नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतर्फे अशोक मयेकर, काँग्रेस आघाडीच्यावतीने नगरसेवक सुदेश मयेकर, महायुतीतील शिवसेनेचे नगरसेवक उमेश शेट्ये आणि भाजपाचे नगरसेवक महेंद्र मयेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ महायुतीमध्ये नगरसेवक उमेश शेट्ये यांनी बंडखोरी करतानाच महेंद्र मयेकर यांनी थेट अशोक मयेकर यांनाच आवाहन दिले आहे़
नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे १५, भाजपाचे ८ असे महायुतीचे २३ नगरसेवक आणि राष्ट्रवादी ७ व काँग्रेसचे १ असे काँगे्रेस आघाडीचे ८ असे पक्षीय बलाबल आहे़ यामध्ये भाजपाच्या ६ नगरसेवकांनी वेगळ्या गटाची स्थापना केली़ शिवसेनेचे नगरसेवक उमेश शेट्ये यांच्याबरोबर त्यांच्याच पक्षातील २ नगरसेवक असल्याने महायुतीचे आणखी ३ नगरसेवक फुटले़ त्यामुळे आता महायुतीकडे केवळ १४ नगरसेवक राहिले आहेत़
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीमध्ये काँग्रेस आघाडीचे ८, भाजपाचे फुटीर ६ नगरसेवक आणि शिवसेनेचे ३ असे एकूण संख्याबल १७ झाले आहे़ अशोक मयेकर यांना शह देण्यासाठी भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस आघाडीचे नगरसेवक यांनी एकजूट केल्यास युतीच्या सत्तेला मोठा धक्का बसणार आहे़ (शहर वार्ताहर)
रत्नागिरीत चार अर्ज दाखल
नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेला संधी मिळणार असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची नावे पुढे आली होती. मात्र, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ उमेश शेट्ये यांचाच अर्ज दाखल झाला असून भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर आणि राष्ट्रवादीतर्फे सुदेश मयेकर या तीन ‘मयेकर’ अर्ज आज दाखल झाले आहेत.