दोन वर्षे महेंद्र मयेकरच नगराध्यक्ष
By Admin | Published: October 30, 2014 12:49 AM2014-10-30T00:49:39+5:302014-10-30T00:50:03+5:30
उमेश शेट्ये : अविश्वास ठराव आणल्यास सहकार्य नाही
रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मीच त्या पदाचा दावेदार होतो. मात्र, ज्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला तेच आता खड्ड्यात गेले आहेत. त्यामुळे भाजपाचे महेंद्र मयेकर हे आपला २३ डिसेंबर २०१६ पर्यंतचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेल्यास आपण त्यावर सही करणार नाही, असे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक उमेश शेट्ये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे नजीकच्या काळात रत्नागिरी नगराध्यक्षपदावरून राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत.
रत्नागिरी पालिकेत पावणेतीन वर्षांपूर्वी सेना - भाजपा युतीची सत्ता आली. त्यावेळी प्रत्येकी सव्वा वर्ष नगराध्यक्षपद सेना - भाजपाकडे आलटून पालटून राहील, असे ठरविण्यात आले होते. मात्र, त्यामुळे भाजपाच्या नगराध्यक्षपदाचे अशोक मयेकर यांचे सव्वा वर्ष संपताच सेनेचा नगराध्यक्ष पालिकेत बसणार होता. उमेश शेट्ये यांना सेनेतर्फे नगराध्यक्षपद देण्याचे जवळपास निश्चित झालेले असताना आयत्यावेळी भाजपने निवडणूक काळापुरते तीन महिन्यांसाठी नगराध्यक्षपद मागितले व ते देण्याचा निर्णय झाला, त्यामागे राजकारण होते. त्यामुळे आता मयेकर यांच्या विरोधात अविश्वास मांडला गेलाच, तर त्यावर आपण स्वाक्षरी करणार नाही, असे शेट्ये म्हणाले.
रत्नागिरी पालिकेत २८ नगरसेवक असून, सेना-भाजपा युती राज्यस्तरावर तुटली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व सेनेचे नगरसेवक यांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला तरी त्यासाठीचे २१ हे संख्याबळ पूर्ण होत नसल्याने महेंद्र मयेकर यांचे नगराध्यक्षपद सुरक्षित बनले आहे. तरीही अविश्वास ठराव आलाच तर त्याला आपला पाठिंबा नसेल, असेही उमेश शेट्ये यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आपण तीन महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. आपले सीमकार्ड हे पोस्टपेड आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण करणार, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केल्याने पुढील दोन वर्षे तरी मयेकर हेच नगराध्यक्षपदी राहणार असल्याची स्पष्ट चिन्ह आहेत. (प्रतिनिधी)