डाकसेवकांचा संप सुरुच

By Admin | Published: March 18, 2015 10:11 PM2015-03-18T22:11:05+5:302015-03-18T23:58:41+5:30

शासन उदासीन : विविध मार्गांनी असंतोष व्यक्त

Mail contacts are continuing | डाकसेवकांचा संप सुरुच

डाकसेवकांचा संप सुरुच

googlenewsNext

चिपळूण : अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेने १० मार्चपासून पुकारलेला बेमुदत संप गेले ९ दिवस सुरु आहे. विविध प्रलंबित मागण्या या डाकसेवक संघटनेने शासनासमोर ठेवल्या आहेत. परंतु, शासनाने अद्यापही त्यावर विचार न केल्याने नऊ दिवसानंतरही हा संप सुरूच आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासून १५० वर्षे सरकारने आपला केवळ वापर करुन घेतला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या जनतेसाठी डाकसेवक हा खऱ्या अर्थाने देवदूत असतो. ऊन, वाऱ्याची तमा न बाळगता तो संदेशवाहकाचे काम प्रामाणिकपणे करतो. स्वातंत्र्यानंतर आजही जेथे दळणवळणाच्या मूलभूत सुविधा नाहीत अशा ठिकाणी डाकसेवक कार्यरत असतो. मात्र, आजपर्यंत कोणत्याही सरकारला त्याची दया येत नाही. याबद्दल संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.संघटनेने ग्रामीण डाकसेवकांसाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तींची कमिटी नेमावी, ग्रामीण डाकसेवकांनाही टपाल खात्यात सामावून घ्यावे, केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवासुविधा द्याव्यात, टपाल खात्याच्या खासगीकरणाचा धातलेला घाट बंद करावा अशा प्रमुख मागण्या आहेत. संपूर्ण देशभर हा संप ७२ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ४५ ते ५० टक्के संप यशस्वी झाला आहे. या संपाला ऊर्जा मिळावी, म्हणून अनेक ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको, धरणे, उपोषणे असे विविध कार्यक्रम सुरु आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामीण डाकसेवकांनी भूलथापांना, अफवांना बळी न पडता केंद्रीय शाखेचा आदेश येईपर्यंत हा संप सुरुच ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य व गोवा प्रांताचे अध्यक्ष व अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव डी. एस. सागवेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

अन्य शाखांनी कामबंद करावे
गेले ८ दिवस संप मिटवण्यासाठी सरकारने पावले उचलली नाहीत. शासनाने लक्ष दिले नाही, तर हा संप चिघळण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात मिळणाऱ्या सर्व सेवा ठप्प होणार आहेत. लाईट बिल, फोन बिल, सेव्हिंग, आरडी, पोस्ट विमा, पत्राचा बटवडा, दहावी, बारावीचे पेपर गठ्ठे आदी कामे बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. असे असताना जिल्हास्तरीय अधिकारी खोटी माहिती पसरवत आहेत ही खेदाची बाब आहे. जिल्ह्यातील ५० टक्के डाकघर शाखा बंद आहेत. इतर शाखांनीही काम बंद ठेवून संपात सहभागी व्हावे, असे आवाहन सागवेकर यांनी केले आहे.

Web Title: Mail contacts are continuing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.