माजळ - मधलीवाडीतील ग्रामस्थांचा कोरोना चाचणीस नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:11+5:302021-06-04T04:24:11+5:30
लांजा : ‘आमच्या वाडीत एकही कोरोना रुग्ण नाही. तरीही आमच्या वाडीतील कोरोनाची चाचणी कशासाठी, असा प्रश्न करत माजळ मधलीवाडी ...
लांजा
: ‘आमच्या वाडीत एकही कोरोना रुग्ण नाही. तरीही आमच्या वाडीतील कोरोनाची चाचणी कशासाठी, असा प्रश्न करत माजळ मधलीवाडी येथील ग्रामस्थांनी कोरोनाची चाचणी करून घेण्यास नकार दिल्याने गाेंधळ निर्माण झाला हाेता. तहसीलदार, आरोग्य अधिकारी, पोलीस यांनी ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतरही ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने प्रशासनाला चाचणी न करतात माघारी परतावे लागले.
तालुक्यातील माजळ - मधलीवाडी येथे एकाच घरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या रुग्णांच्या घरातील लोकांनी चाचणी करून घेतली आहे. या रुग्णांच्या संपर्कात काेणीही आलेले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच वाडीमध्ये एकही ग्रामस्थ आजारी नसताना तुम्ही आमची चाचणी करण्याचा घाट कशासाठी घालत आहात, असा प्रश्न उपस्थित करून चाचणी करण्यास नकार दिला. ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे, तहसीलदार समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कोरोना चाचणी का करायची, हे तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी मारुती कोरे यांनी ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाच्या संभाव्य कारवाईला सामोरे जाण्याचा ग्रामस्थांना इशारा देण्यात आला. मात्र, तरीही ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आराेग्य पथकाला ग्रामस्थांची चाचणी न करताच माघारी परतावे लागले़
-------------------------
लांजा तालुक्यातील माजळ - मधलीवाडीतील ग्रामस्थांनी चाचणी करण्यास नकार दिल्याने तहसीलदार, पाेलीस, तालुका आराेग्य अधिकारी यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.