भातावरील प्रमुख रोग; नियंत्रणात्मक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:52+5:302021-08-26T04:33:52+5:30

करपा रोगामध्ये रोगाची लक्षणे, पाने, पानांचे आवरण (पर्णकोष), रोपाचे पेर, लोंबीचा देठ, दाण्याची टरफले या सर्व भागांवर दिसून येतात. ...

Major diseases of rice; Control measures | भातावरील प्रमुख रोग; नियंत्रणात्मक उपाय

भातावरील प्रमुख रोग; नियंत्रणात्मक उपाय

googlenewsNext

करपा रोगामध्ये रोगाची लक्षणे, पाने, पानांचे आवरण (पर्णकोष), रोपाचे पेर, लोंबीचा देठ, दाण्याची टरफले या सर्व भागांवर दिसून येतात. रोगाच्या प्राथमिक अवस्थेत पानांवर निळसर जांभळ्या रंगाचे अत्यंत छोटे ठिपके दिसून येतात. कालांतराने अशा ठिपक्यांचे आकारमान वाढून ते शंखाकृती किंवा डोळ्याच्या आकाराचे म्हणजेच मध्यभाग फुगीर व दोन्ही कडांकडे निमुळते होतात. ठिपक्यांची रुंदी ०.५ ते १ सेंटिमीटर असते. पानांच्या आंतरभागात बुरशीची वाढ पूर्ण झाल्यानंतर या ठिपक्यांच्या मध्यभागी बुरशी बीजे तयार होऊन त्यांचा मध्यभाग राखाडी रंगाचा, तर कडा तपकिरी रंगाच्या होतात. काही काळानंतर पानावरील अनेक ठिपके एकमेकांत मिसळून संपूर्ण पाने करपून जातात. काहीवेळा पानांप्रमाणेच पानांच्या आवरणावरही शंखाकृती ठिपके दिसून येतात. त्यांचा मध्यभाग पांढरा असतो.

करपा रोग बियाणाद्वारे पसरतो. रोगग्रस्त शेतातील पूर्व पिकाच्या अवशेषांवर (धसकटे, पेंढा इत्यादी) रोगकारक बुरशी सुप्तावस्थेत राहते. तसेच भाताच्या रानटी जाती आणि शेताच्या बांधावर वाढणाऱ्या तणांवर बुरशी सुप्तावस्थेत राहते. करपा रोगांचे नियंत्रण करण्यासाठी शेतातील धसकटे गोळा करून जाळावीत. पेरणीपूर्वी बियाणास मिठाच्या द्रावणातील प्रक्रिया करावी. लागवडीकरिता रोगास जास्त प्रमाणात बळी पडणाऱ्या स्थानिक जातींची उदा. झिनिया, भस, कोळंब, चिमणसाठ, वरंगळ इत्यादी जातींची निवड करून नये. लागवडीकरिता रोगप्रतिकारक आणि सुधारित जातींची निवड करावी. लोंबीतील दाण्यांवर रोग आढळलेल्या शेतातील बियाणे पेरणीसाठी वापरू नये. रोगाची लक्षणे दिसून येताच पिकांवर ०.१ टक्का ट्रायसायक्लोझाॅल किंवा २ किलो झायनेंब किंवा ०.५०० किलो एडीफेनफाॅस किंवा काॅपरऑक्सी क्लोराईड १२५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारल्यास करपा रोग आटोक्यात येतो. शिफारसीनुसार नत्र खतांचा वापर करावा.

अतिरिक्त वापर टाळावा

पेरणीपूर्व ४ ग्रॅम पायरोक्युराॅन एक किलो बियाणास या प्रमाणात किंवा ट्रायसाक्लाॅझाॅल २ ग्रॅम प्रति किलो बियाणास या प्रमाणात चोळून पेरणी करावी. नत्र खताच्या अतिरिक्त वापरामुळे रोगाचे प्रमाण वाढते. त्यामुळे खताचा अतिरिक्त वापर टाळणे योग्य राहील. जैविक पध्दतीने रोगनियंत्रण करताना ट्रायकोडर्मा व्हिरीडी नावाच्या बुरशीजन्य जैविकाची फवारणी करावी. पेरणीपासून कापणीपर्यत योग्य काळजी आवश्यक आहे.

सर्व अवस्थेत प्रादुर्भाव

पीक वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये पिकास करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोपवाटिकेमध्ये रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाल्यास, सर्व रोपांची पाने करपतात. यालाच ‘रोप जळणे’ अथवा ‘नर्सरी बर्न’ असे म्हणतात. रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव पेरांवर झाल्यास रोगग्रस्त भाग काळा पडून कुजतो व पेर मोडते. लोंबी भरण्याच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास लोंबीचा देठ काळा पडून कुजतो.

दाण्यांचे होते नुकसान

लोंबीतील दाण्यांच्या टरफलांवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. या ठिपक्यांमुळे दाण्यांचे नुकसान होते. राेपवाटिकेतील रोपांना करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास जवळपास सर्व रोपे सुकून मरतात. अशावेळी बियाणांची फेरपेरणी करावी लागते. पानांवर अनेक ठिपके वाढल्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेवर विपरित परिणाम होऊन लोंबीतील अपरिपक्व दाण्यांचे प्रमाण वाढते. पेर कुजून मोडल्यामुळे तेथे लोंबी येत नाही.

Web Title: Major diseases of rice; Control measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.