कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या दफनविधीसाठी पर्यायी व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:31+5:302021-05-08T04:33:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील गोवळकोट रोड येथील कब्रस्तानमध्ये दफनविधीचे प्रमाणही वाढले आहे. भविष्यात येथील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील गोवळकोट रोड येथील कब्रस्तानमध्ये दफनविधीचे प्रमाणही वाढले आहे. भविष्यात येथील जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या दफनविधीसाठी प्रशासनाने शहरात किंवा परिसरात कब्रस्तानची वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंचचे अध्यक्ष अन्वर पेचकर यांनी केली आहे.
याबाबत अन्वर पेचकर यांनी सांगितले की, गोवळकोट रोड येथील कब्रस्तानमध्ये चिपळूण तालुका मुस्लीम विकास मंच या संस्थेतर्फे कोविडने मृत झालेल्या व्यक्तींसाठी घुसल व कफनविधीची व्यवस्था करण्यात आली आहे. अलीकडे या कब्रस्तानमध्ये दफनविधीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शहरालगत तसेच गावागावांत कब्रस्तानची स्वतंत्र व्यवस्था आहे. मात्र, तेथे कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तींना दफन केले जात नाहीत. अशी कारणे अनेक जण सांगून ते मृतदेह गोवळकोट रोड येथे घेऊन येतात. ज्यांच्या परिसरात व गावांमध्ये अशा दफनविधीसाठी विरोध होतो, तेथील मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी किंवा नागरिकांनी संस्थेशी संपर्क साधावा. मंचाचे पदाधिकारी सहकार्य करतील. गोवळकोट रोड येथील कब्रस्तानमध्ये विरोध होत नाही. मग अन्य गावांतून कोविडने मृत झालेल्या व्यक्तीच्या दफनविधीला विरोध का होतो, गोवळकोट रोड येथे माणसे राहात नाहीत का, असे प्रश्नही पेचकर यांनी केले आहेत.