पहिल्या इयत्तेपासून मुलांना वेगळं करण्याचा
By admin | Published: February 14, 2016 10:04 PM2016-02-14T22:04:07+5:302016-02-15T01:18:46+5:30
घाटमकरंद अनासपुरे : पालपेणे शाळेला आयएसओ मानांकन प्रदान...
शृंगारतळी : प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत शिकणाऱ्यांनीच इतिहास घडवला आहे. ज्यांना कसलीच पार्श्वभूमी नसलेली मोठी माणसे आज समाजात आहेत, ती आली कुठून? याचा विचार करण्याची गरज आहे. आपली शिक्षण व्यवस्था किती गमतीशीर आहे. एकीकडे विनामूल्य शिकणारी जिल्हा परिषदेतील मुले, तर दुसरीकडे वर्षाकाठी लाखभर रुपये भरून खासगी शाळेत शिकणारी मुले ही आयुष्यात एकत्र कशी येतील, हा मूलभूत प्रश्न आहे. त्यांना शाळेच्या पहिल्या इयत्तेपासूनच वेगळे करण्याचा घाट समाजव्यवस्थेत घातलेला आहे. त्यामुळे आपली समाजव्यवस्था चांगली कशी निर्माण होईल? असे प्रतिपादन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.गुहागर तालुक्यातील प्राथमिक शाळा, पालपेणे नं. ३च्या आयएसओ मानांकन प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मकरंद व शिल्पा अनासपुरे यांच्याहस्ते मुख्याध्यापक मकरंद विचारे व उपशिक्षक प्रदीप पडवळ यांना गौरविण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख नामदेव लोहकरे, विश्वास बेलवलकर, अरविंद पालकर, महादेव पडवेकर, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय टाणकर, दीपक टाणकर, सरपंच उर्मिला महाडिक, प्रकाश शिर्के उपस्थित होते.प्रशासनातून निवृत्त झाल्यानंतर कर्मचारी किंवा अधिकारी प्रशासनाच्या कामकाजाच्या विरोधात बोलतात. मला नेहमी असे वाटते की, या समाज व्यवस्थेमध्ये काम करत असताना का बोलले जात नाही? आपण या व्यवस्थेला कुठपर्यंत नेले आहे? याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला अधिकारीवर्ग उपस्थित नाही, हे काय नवीन नाही. याच्यावर आम्ही सिनेमासुद्धा केला आहे. आपला देश कागदोपत्री सुजलाम सुफलाम आहे. परदेशातला माणूस आपल्याकडे आला आणि त्याने कागदपत्र पाहिली तर असा देश जगाच्या पाठीवर नाही, असे म्हणेल. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे, असे अनासपुरे म्हणाले.आपण केवळ कागदोपत्री चांगली असलेली माणसे आहोत. मी पण खेड्यात शिकलो आहे. त्याचा मला अभिमान आहे, असे मत अनासपुरे यांनी व्यक्त केले. आपण चांगल्या लोकांचे त्यांच्या हयातीत कौतुक करत नाही. मात्र, तो गेल्यानंतर लक्षात येते किती मोठा व्यक्ती होता. यावेळी मुलांसाठी आरओ पाणी शुद्धीकरण यंत्र, ग्रंथालयासाठी पुस्तके व कुपनलिका देण्याचे त्यांनी जाहीर केले. (वार्ताहर)
..अन्यथा काहीच घडणार नाही
काही माणसे स्वत:च्या ध्येयात वेडी झालेली असतात. चांगले काम करणारे अधिकारी, शिक्षक समाज घडवू शकतात, हे सर्वांना माहीत असते, त्यांना पाठबळ देण्याची गरज असावी अन्यथा युगानुयुगे काहीच घडणार नाही, असे अनासपुरे म्हणाले.