पाकिस्तानचे चार तुकडे करा : ब्रिगेडिअर सुधीर सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:12 PM2019-03-01T12:12:51+5:302019-03-01T12:17:03+5:30
मागील तीस वर्षात आपले दहा हजाराहून अधिक सैनिक पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. एखाद्या युध्दातही एवढे सैनिक कधी मारले गेलेले नाहीत . त्यामुळे पाकविरुध्द आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असुन आता लुटूपुटूची लढाई न करता एकदाच पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा व त्यांचे चार तुकडे करावेत अशी रोखठोक भुमिका माजी खासदार व आपचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी राजापुरात मांडली.
राजापूर : मागील तीस वर्षात आपले दहा हजाराहून अधिक सैनिक पाकपुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. एखाद्या युध्दातही एवढे सैनिक कधी मारले गेलेले नाहीत . त्यामुळे पाकविरुध्द आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली असुन आता लुटूपुटूची लढाई न करता एकदाच पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा व त्यांचे चार तुकडे करावेत अशी रोखठोक भुमिका माजी खासदार व आपचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
रत्नागिरी जिल्ह्यात आप पक्षाची बांधणीसाठी आपण दौऱ्यावर असून काही मित्रपक्षांची तिसरी आघाडी करुन लोकसभेच्या या मतदार संघासह राज्यात नऊ जागा लढविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली .
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून दोन दिवसांपूर्वी भारतीय हवाईदलाने पाक हद्दीत घुसुन दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी केलेली ठोस कारवाई याबाबत विचारले असता मागील चाळीस वर्षाचा काळ आजच्या स्थितीला जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला.
या कालखंडात जागतिक पातळीवरील घटनांचा उल्लेख करीत अमेरिकेने पाकमध्ये कसा दहशतवाद पोसला व त्याचे कसे परिणाम घडत गेले त्यावर विस्तृत माहिती दिली. ड्रग्स, स्मगलिंग व अफुची विक्री यामधुन हे प्रकार घडत असून त्यामध्ये अनेकांचा हात असल्याचे त्यांनी सांगितले. आज त्यांचे मोठे नेटवर्क पसरले असून ते जोवर उध्वस्त होत नाही तोवर दहशतवाद संपणार नाही असे त्यांनी ठासून सांगितले.
सरकार काँग्रेसचे असो वा भाजपाचे असो, काश्मीरचा प्रश्न हा दुर्लक्षित राहिला अशी त्यांनी स्पष्ट भुमिका मांडली. काश्मीरमध्ये मुफ्ती समवेत भाजपचे बनलेले सरकार हे पाप व शाप होता. त्या सरकारमुळे काश्मीरमधील शांतता भंग पावली व पुन्हा तेथे दहशतवाद सुरु झाला, असा आरोप सुधीर सावंत यांनी केला. अशा पापामुळेच पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला व चाळीसहुन अधिक जवान शहीद झाले. दहशतवाद पोसणाऱ्या पाकला आता कायमची अद्दल घडवावी अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
जिल्ह्यात आरपीआयचे दोन गट, बहुजन विकास आघाडी वेल्फर पार्टी, बामसेफ यासहित विविध संघटना व आप पक्ष यांची आघाडी होणार असुन ७ मार्चला बैठक पार पडणार आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघासह राज्यात नऊ जागा लढवणार असल्याचे त्यान्नी स्पष्ट केले. रत्नागिरीत पक्ष संघटनाचे काम सुरु असल्याचे सांगताना लांज्याचे रियाज काझी यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याची त्यांनी माहिती दिली.
परराष्ट्र धोरणावरही त्यांनी रोखठोक भाष्य केले. कारगिल युध्दात अमेरीकेच्या दबावामुळे भारताने आपल्या सैन्याला सीमा पार करु दिली नव्हती, असा त्यांनी आरोप केला. भारताचा पाकच्या ताब्यात असलेल्या पायलटबाबत विचारले असता जिनिव्हा करारानुसार पाकच्या ताब्यात असलेल्या पायलटला भारताकडे सुपुर्द करावे लागेल, अशी त्यांनी माहिती दिली.