राज्य पतसंस्था चळवळ अधिक प्रभावी करा : पांडुरंग खंडागळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:33 AM2021-09-19T04:33:03+5:302021-09-19T04:33:03+5:30
रत्नागिरी : पतसंस्था चळवळ व्यापक पसरली आहे. ५० टक्के जनता या चळवळीजवळ जोडलेली आहे. मात्र, नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ...
रत्नागिरी : पतसंस्था चळवळ व्यापक पसरली आहे. ५० टक्के जनता या चळवळीजवळ जोडलेली आहे. मात्र, नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे. त्यासाठी थिंक टँकच्या बैठकीत सर्व सदस्यांनी आपला अनुभव पणाला लावून मौलिक योगदान करावे व भविष्यातल्या पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असे काम व्हावे, अशी अपेक्षा अप्पर आयुक्त डॉ. पांडुरंग खंडागळे यांनी व्यक्त केली.
पतसंस्था चळवळीत येणाऱ्या अडचणी, प्रश्न, कायदा सुधारणा या संदर्भात चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या थिंक टँकची बैठक पुणे सेंट्रल बिल्डिंग सहकार आयुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीला सर्व शासकीय तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते. यावेळी डाॅ. खंडागळे यांनी मार्गदर्शन केले.
पहिल्या बैठकीत कामकाजाची रुपरेषा निश्चित करण्यात आली. कायदा बदल, नियम बदल, पोटनियम बदल, कार्यपद्धतीतील सुधारणा अशा पद्धतीने वर्गीकरण करून महिन्यात किमान २ बैठका विषय निश्चित करून घेण्याबाबत एकमत झाले. सदस्यांनी सर्वंकष असे टिपण तयार करून सादर करावे, असेही अप्पर आयुक्त डाॅ. खंडागळे यांनी सांगितले.
नव्याने अंतर्भूत झालेले १४४ कलम वसुलीसंदर्भातील अडचणी, प्रलंबित प्रस्ताव कायद्यातील काही क्लिष्ट होत असलेल्या तरतुदी या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याची पद्धती तसेच सहकार कायद्यातील क्रियावान सभासद संकल्पना कलम ३२ नुसार उपलब्ध करून द्यायची माहिती या संदर्भात अनेक मुद्दे व सूचना या समितीचा सदस्य म्हणून आपण मांडल्याची माहिती ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.