तंबाखूच्या व्यसनाला करा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:23 AM2021-05-31T04:23:05+5:302021-05-31T04:23:05+5:30

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात १० करोडहून अधिक नागरिक विविध माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात. यामध्ये २५ टक्के ...

Make Tobacco Addiction Lockdown | तंबाखूच्या व्यसनाला करा लॉकडाऊन

तंबाखूच्या व्यसनाला करा लॉकडाऊन

googlenewsNext

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात १० करोडहून अधिक नागरिक विविध माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात. यामध्ये २५ टक्के पुरुष तर १३ ते १५ टक्के महिलांचा समावेश आहे. यापैकी १० लाख रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने प्राण गमवावे लागतात. यामध्ये हृदयासंबंधी विकार, स्ट्रोक आणि कर्करोगाचा समावेश आहे. तंबाखूच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा तसेच हार्ट स्ट्रोकचा धोका दुप्पटीने वाढतो तर धुम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका हा २५ टक्क्यांनी अधिक वाढतो. तंबाखूमुळेच तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका, आतडी व इतरही अवयवांचे कर्करोग होतात. त्याशिवाय हृदयावर होणारा तंबाखूचा परिणामही तितकाच घातक आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे शहरातील वेगवेगळ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळेच हृदयरोग, हृदयरोगाचा झटका, पक्षाघात होऊ शकतो. हाता-पायांच्या रक्तवाहिन्याही ब्लॉक होऊन निरनिराळ्या समस्या उद्भवतात. तंबाखूजन्य पदार्थांमुळेच रक्तदाब वाढतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) घटते.

तंबाखूमधील अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, अ‍ॅन्टबीन, अ‍ॅनाबेसीन अशी रसायने असून, भारतीय तंबाखूमध्ये मक्र्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात. या व्यतिरिक्त तंबाखूच्या धुरात व धुम्रपानात डीडीटी, बुटेन, सायनाईड, अमोनिया आदी रसायने आढळतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात, त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते.

तंबाखू सोडण्यासाठी करा हे उपाय?

१. सर्वात आधी व्यसन सोडण्यामागचे कारण लक्षात घ्या. उदा. कर्करोग, हृदयविकार, फुफ्फुसाचा आजार

२. तंबाखू सोडण्याची तारीख ठरवा.

३. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा आधार घ्या.

४. समुपदेशनाचा आधार घ्या.

५. कुटंब तसेच मित्रपरिवाराची मदत तसेच आधार घ्या. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा.

६. ताणतणाव टाळा, अल्कोहोलचे सेवन टाळा, तलफ लागल्यास दुसरीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करा.

७. अधूनमधून व्यसन केले तर चालेल, आठवड्यातून एकदा व्यसन करण्यास हरकत नाही, अशा गैरसमजूतींपासून दूरच रहा जेणेकरून पुन्हा व्यसनांच्या आहारी जाल.

८. ध्यानधारणा, योगसाधना करा.

९. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि तंबाखू सोडण्याचे कित्येक फायदे आहेत, हे देखील स्वतःच्या मनाला पटवून द्या.

१०. प्रयत्न करा. हरलात तर स्वतःला दोष न देता, पुन्हा नव्या उमेदीने व्यसनमुक्तीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचला.

- डॉ. धीरज खडकबाण,

सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर, चिपळूण

Web Title: Make Tobacco Addiction Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.