रत्नागिरीच्या बाजारात आफ्रिकेचा ‘मलावी’ हापूस
By मेहरून नाकाडे | Published: December 11, 2023 11:43 AM2023-12-11T11:43:22+5:302023-12-11T11:43:43+5:30
महाराष्ट्र व गुजरात राज्यांत या ‘मलावी’ हापूस आंब्याला मोठी मागणी
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : आंबा म्हटला की, सर्वात आधी आठवताे ताे काेकणचा हापूस आंबा. हा आंबा गुढीपाडव्याला बाजारात दाखल हाेताे आणि त्यानंतर खवय्यांना ताे खायला मिळताे. मात्र, काेकणचा हापूस बाजारात दाखल हाेण्यापूर्वीच आफ्रिकेतील ‘मलावी’ आंबा रत्नागिरीच्या बाजारात दाखल झाला आहे. हापूस आंब्यासारखाच दिसणाऱ्या या आंब्याची आठवडाभरात २०० डझन विक्री झाली असून, ३५०० रुपये डझन दराने त्याची विक्री हाेत आहे.
मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमध्ये ‘मलावी’ देशातून या हापूसची आवक सुरू झाली आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्यांत या ‘मलावी’ हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘मलावी’ हापूसची आवक भारतात होत आहे. हा आंबा सध्या रत्नागिरीच्या बाजारात दाखल झाला असून, ३,५०० रूपये डझन दराने त्याची विक्री सुरू आहे. रंगीत वेस्टन लावून बाॅक्स पॅकिंगमधून त्याची विक्री केली जात आहे. ‘मलावी’ आंब्याची चव कोकणातील हापूसप्रमाणेच आहे. त्यामुळे रत्नागिरीकरही ताे खरेदी करून त्याची चव चाखत आहेत.
काेकणातील हापूसची ‘मलावी’त लागवड
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी कोकणातील हापूस आंब्याची कलमे आफ्रिकन देश ‘मलावी’ येथे नेऊन लागवड करण्यात आली होती. चारशे ते पाचशे एकर क्षेत्रावर हापूस लागवड करण्यात आली आहे. तेथील हवामानानुसार हा आंबा नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरमध्ये विक्रीला येतो.