लसीकरणासह नवीन नियमावलीचे पालन करण्याकरिता मंडणगड प्रशासनाने कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:31 AM2021-04-06T04:31:04+5:302021-04-06T04:31:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या नियमांची तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी कशी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या नियमांची तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल. त्याचबरोबर तालुक्यातील कोविड लसीकरण मोहिमेच्या नियाेजनासाठी मंडणगड प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी तहसीलदार नारायण वेगुर्लेकर यांच्या उपस्थितीत साेमवारी विविध प्रशासकीय खात्यांतील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या सभेला गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठाणकर, डॉ. भगवान पितळे, मुख्याधिकारी विनोद डौले यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. नव्याने घोषित करण्यात आलेल्या नियमावलीचे शंभर टक्के पालन करण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करण्याचे आवाहन तहसीलदार नारायण वेगुर्लेकर यांनी यावेळी केले.
यावेळी आरोग्य विभागाने कमी कर्मचारी संख्याबळामुळे सर्वच आघाड्यांवर काम करण्यासाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यावर नियोजन करुन आठवड्यातील दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन व अन्य वारी असलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी यंत्रणेने पुढे येऊन काम करण्याचे नियोजन करण्यात आले. शहरातील व तालुक्याच्या मुख्य गावातील गर्दी टाळण्यासाठी तसेच नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा सक्तीने वापर करावा, यासाठी नगरपंचायत व ग्रामपंचायतीने नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले.
चाैकट
केवळ ४७६ नागरिकांचे लसीकरण
तालुक्यात ४५ वर्षांवरील १५,४७६ व्यक्ती आहेत व यातील केवळ ४७६ व्यक्तिंनाच लस देण्यात आल्याची बाब यावेळी समाेर आली. उर्वरित १५ हजार व्यक्तिंचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्राम कृती दल व वाडी कृती दलांना अधिक सक्रिय करण्याच्या सूचना तहसीलदारांनी यावेळी दिल्या. आरोग्य यंत्रणेबरोबरच महसूल खात्याचे कर्मचारी व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे याकामी सहकार्य घेण्याचे नियोजन करण्यात आले.
फोटो ओळी- मंडणगड तहसील कार्यालयात आयोजित सभेस प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.