मंडणगड, दापोली नगर पंचायतीतील १४ उमेदवार ३ वर्षांसाठी अपात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:09 PM2022-07-28T12:09:43+5:302022-07-28T12:10:14+5:30
हे उमेदवार पराभूत असल्याने नगरपंचायतीला एकही पद रिक्त होणार नाही.
दापोली : निवडणुकीनंतर विहित कालावधीत खर्च सादर न करणाऱ्या दापोली व मंडणगड नगर पंचायत निवडणूक लढलेल्या १४ उमेदवारांना पुढील ३ वर्षांसाठी अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत. हे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.
नगर पंचायत निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यावर ३० दिवसांच्या आत निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीसाठी झालेला खर्च व शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा असतो. दापोली, मंडणगड नगर पंचायत निवडणुकीत ज्या उमेदवारांनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर ३० दिवसांच्या आत निवडणुकीचा खर्च व शपथपत्र सादर केले नाही, त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती.
मात्र, नोटीस मिळाल्यावर या उमेदवारांनी खुलासाही सादर केला नाही. या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्यासमोर झाली. त्यांनी १४ उमेदवारांना ३ वर्षांसाठी अपात्र केले. मात्र, हे उमेदवार पराभूत असल्याने नगरपंचायतीला एकही पद रिक्त होणार नाही.
मंडणगडचे अपात्र
सुमित्रा निमदे, विजय पोटफोडे, संजय राणे, अनुराग कोळंबेकर, महेंद्र सापटे, मंदार वारणकर, सोनल पवार.
दापोलीचे अपात्र
काझी इस्माईल, किरण घोरपडे, विशाखा पवार, मृणाली सोंडकर, वृषाली कदम हे ३ वर्षांसाठी अपात्र ठरले आहेत.