ST Strike: अनोखी लालपरी, मंडणगडमधील एसटी कर्मचाऱ्यांने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 06:14 PM2022-03-07T18:14:04+5:302022-03-07T18:21:29+5:30
विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी वेगवेगळ्या १४ आगारांमध्ये आतापर्यंत त्यांनी प्रवास केला आहे
तन्मय दाते
रत्नागिरी : गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणासाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. मंडणगड आगारातील चालक बी. डी. मोरे यांनी त्यांच्या दुचाकीवर बांबूच्या साहाय्याने एसटीची प्रतिकृती करून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या दुचाकीवरून फिरत विलीनीकरणाची मागणी करत आहेत. विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी वेगवेगळ्या १४ आगारांमध्ये आतापर्यंत त्यांनी प्रवास केला आहे.
शासनाने विलीनीकरणाची मागणी मान्य न केल्याने अजूनही आमचे कर्मचारी आंदोलन करत आहेतच. तसेच आतापर्यंत १०० कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे, असे सांगत मोरे यांनी जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी सांगितले की, ज्या जिल्ह्यात जात आहोत त्या जिल्ह्यातील नागरिक या प्रतिकृतीचे काैतुक करत आहेत. काेणी एसटीच्या प्रतिकृतीसोबत सेल्फी काढत असून, कोणी चित्रीकरण करतात.
या एसटी प्रतिकृतीवर लढा विलीनीकरणाचा, वाट पाहीन पण एसटीने जाईन, आपल्या घरी आपली वाट पाहत आहे लालपरी, मंडणगड डेपो असे लिहिले आहे.
कर्मचाऱ्यांनाही सेल्फीचा माेह
ही दुचाकी घेऊन त्यांनी रत्नागिरी शहरात फेरफटकाही मारला. एसटीची प्रतिकृती बघून नागरिकांनी मोबाईलमध्ये फोटोही काढले. ते माळनाका येथे बसलेल्या कर्मचाऱ्यांना भेटायला गेले असता कर्मचाऱ्यांनाही एसटी सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.