गोवंशसदृश मांसाचे केंद्र बनतोय मंडणगड तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:35+5:302021-03-31T04:32:35+5:30
मंडणगड : चिपळूण, लोटे येथील गोवंश हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मंडणगड तालुका गोवंशसदृश मांसाचे पुरवठा करणारे केंद्र बनला ...
मंडणगड : चिपळूण, लोटे येथील गोवंश हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर मंडणगड तालुका गोवंशसदृश मांसाचे पुरवठा करणारे केंद्र बनला आहे. तालुक्यातील कुंबळे व लाटवण पंचक्रोशीतील अनेक गावांची नावे या प्रकरणात पुढे आली आहेत. राज्य शासनाच्या गोवंश संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास स्थानिक यंत्रणेस विविध कारणांनी मोठ्या अडचणी येत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील म्हाप्रळ चेक पोस्ट येथे पाळीव प्राण्यांचे दोन हजार किलो मांसाची वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या स्थानिक पोलीस यंत्रणेने वाहतूक करताना पकडल्या होत्या. मार्च महिन्याच्या अखेरीस अशाच पद्धतीने अडीच हजार किलो मांसाचे वाहतुकीचे प्रकरण पुढे आले आहे. यावरून चिपळूण येथील प्रकारानंतर संबंधित लोकांनी मंडणगड तालुक्याकडे लक्ष वळवले असल्याचे दिसून येत आहे.
लाटवण कुंबळे पंचक्रोशीतील मुरादपूर, वलोते, पिंपळोली या गावात गोमांस पुरवठा होत असल्याची माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे आल्याने जानेवारी महिन्यात मोठी कारवाई करण्यात स्थानिक यंत्रणेला यश आले होते. मात्र या प्रकरणात पुढे नेमकी कोणती कारवाई झाली, त्या प्रकरणात किती आरोपी सापडले, याचबरोबर मुद्देमाल म्हणून पकडण्यात आलेले पाळीव प्राण्याचे मांस नेमके कोणत्या प्राण्याचे होते, या संदर्भात प्रयोगशाळेच्या अहवाल नेमकी कोणती माहिती पुढे आली आहे, या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत.
आता दापोली कस्टम विभागाकडून आणखी मोठी कारवाई केली आहे. याच परिसरात सुमारे दोन वर्षांपासून शेतकऱ्यांची पशुधन विशेषतः गोवंश या सदरात बसणारे गाय बैल अचानक गायब होण्याच्या शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. या संदर्भात मंडणगड पोलीस स्थानकात अधिकृत तक्रारीही झाल्या आहेत. मात्र प्रत्येक प्रकरण छडा लागून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला गेलेला आहे, असे मात्र झालेले नाही. नवीन वर्षात तालुकाच नव्हे तर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस उत्पादन करणारे व त्याची वाहतूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलत्या काळातील नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीत यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस यंत्रणेस आता विशेष काम करावे लागणार आहे हे मात्र निश्चित झाले आहे.
लाटवण पंचक्रोशीकडे पोलिसांचे असलेले लक्ष, या विभागातील गस्तीचे प्रमाण, पोलीस चेक नाक्यांचा अभाव, पोलीस दलातील मनुष्यबळाचा अभाव गुन्ह्यांचे तपासकामी आवश्यक असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या यंत्रसामग्रीचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोपींचा शोध लावण्यात यंत्रणा कमी पडत असल्यानेच आरोपी निर्ढावले असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच तालुक्यात पाळीव प्राण्यांची कत्तल व मासांची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांचे धारिष्ट्य वाढले आहे.