मंडणगडची आरोग्य व्यवस्था म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:53+5:302021-05-19T04:32:53+5:30
मंडणगड : तालुक्यात भिंगळोली येथे एकाच ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय महिनाभरापूर्वी सुरू झाले आहे. मात्र, तेथे साधनसुविधांसह कुशल वैद्यकीय ...
मंडणगड : तालुक्यात भिंगळोली येथे एकाच ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय महिनाभरापूर्वी सुरू झाले आहे. मात्र, तेथे साधनसुविधांसह कुशल वैद्यकीय मनुष्यबळाचा अभाव असून, मंडणगड हे काळ्या पाण्याची शिक्षा असल्यासारखे झाले आहे. सुविधा कमी असलेले एकमेव सरकारी रुग्णालय आणि एकही खासगी रुग्णालय नाही, यामुळे मंडणगड तालुक्यातील रुग्णांना दापोली आणि खेडचाच आधार होत आहे.
एका बाजूला कोरोना रुग्ण वाढत असताना ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये परस्पर समन्वयाचा अभाव दिसत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशा सुविधा नाहीत आणि कोविड रुग्णालयात रूपांतर केल्यामुळे इतर आजारांवरील उपचार बंद आहेत, अशी स्थिती भिंगळोली ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे. यामुळे पूर्ण तालुक्याची गैरसोय झालेली आहे.
भिंगळोलीचा कोविड रुग्णालयाचा दर्जा केवळ कागदावर आहे. साधनांच्या अभावामुळे केले जाणारे नाममात्र उपचार कोरोनाग्रस्तांच्या अडचणीत वाढ करणारे आहेत. कोविडमुळे फुफ्फुसावर झालेला परिणाम ही सर्वांत धोकादायक बाब आहे. फुफ्फुसे किती प्रमाणात बाधित झाली आहेत, यावरच प्रमुख उपचाराची दिशा ठरते. मात्र, त्यासाठी आवश्यक सीटी स्कॅन मशीन येथे उपलब्ध नाही. कोरोना झालेल्या रुग्णाला श्वसनाचा त्रास अधिक होतो. मात्र, त्यावरील उपचाराचे महत्त्वाचे साधन असलेले व्हेंटिलेटर रुग्णालयात उपलब्ध नाही. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात १० पल्स ऑक्सीमीटर, ५ थर्मल गन, १० बीटल साईन मॉनिटर, १० जम्बो सिलिंडर, ५ ग्लोकोमीटर, १० फेसशिल्ड यांसह अनेक प्रकारचे साहित्य हवे आहे. या साधनांबरोबरच ती घेऊन उपचार करणारा एखादा फिजिशियनही रुग्णालयात पूर्ण वेळ उपलब्ध असण्याची आवश्यकता आहे.
सुविधा उपलब्ध नसल्याने मंडणगड तालुक्यातील रुग्णांना सीटी स्कॅनसाठी दापोली, महाड, माणगाव ही शहरे गाठावी लागतात. आजार गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णांना खेड, दापोली, महाड किंवा रत्नागिरी गाठावे लागत आहे. सध्या ग्रामीण रुग्णालयात ३० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. यात १० ऑक्सिजन बेड आहेत. सध्या बंद असलेल्या कोविड चाचण्यांची संख्या वाढवणे, याचबरोबर नेहमीच्या आजारावरील उपचारांची सोय याकरिता उपायांची आवश्यकता निर्माण झाली आहे.
याबाबत आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील कोरोनाबाधितांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. १८ मे २०२१ अखेर तालुक्यात एकूण ५९२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. १९ रुग्ण नव्याने सापडले आहेत. १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात २ रुग्ण कोविड सेंटरमध्ये, ११० रुग्ण घरी तर ८ रुग्ण कोविड रुग्णालयात दाखल आहेत. रत्नागिरी व लोटे येथे प्रत्येकी १ रुग्ण उपचार घेतात. आतापर्यंत तालुक्यात ५८० रुग्ण सापडले असून, त्यातील ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के तर मृत्यूचे होण्याचे प्रमाण २ टक्के इतके आहे.