कोकणात होणार माणगा बांबूची लागवड

By admin | Published: August 24, 2016 10:36 PM2016-08-24T22:36:43+5:302016-08-24T23:41:21+5:30

कोकण कृषी विद्यापीठ : रोपवाटिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात

Manga bamboo planting in Konkan | कोकणात होणार माणगा बांबूची लागवड

कोकणात होणार माणगा बांबूची लागवड

Next

दापोली : कोकणामध्ये माणगा बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत वनशास्त्र महाविद्यालय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीतर्फे माणगा बांबू लागवड वाढवण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यामुळे कोकणात माणगा जातीच्या बांबूची लागवड होणार आहे.सिंधुदुर्गमध्ये दोडामार्ग व कुडाळ, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, देवरुख व लांजा तसेच पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये माणग्याची रोपवाटिका उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी माणगा बांबू मातृवृक्ष बेटांची उभारणी करण्यात आली असून, विद्यापीठाने शिफारस केलेल्या काडी पद्धतीने रोपे तयार करण्यात येणार आहेत. शासनाच्या माणगा बांबूच्या अधिकृत रोपवाटिकेतून सिंचन व इतर सुविधा निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर वनशास्त्र महाविद्यालयाने पश्चिम घाटामधील निवडलेल्या दर्जेदार माणगा बांबूचे वाण नियोजित रोपवाटिकेशेजारी लागवड करुन माणगा बांबूची मातृवृक्ष बाग उभारण्यात येणार आहे.
या रोपवाटिकेद्वारे ५० हजार रोपे तयार करण्याचे ठरवण्यात आले असून, त्यांची उपलब्धता सामान्य शेतकऱ्यांना रास्त दरात करुन देण्यात येणार आहे.
इच्छुक शेतकऱ्यांना माणगा बांबू लागवड व व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार असून, निवडक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये प्रात्यक्षिक लागवड करण्यात येणार आहे.
उभारण्यात आलेल्या रोपवाटिकेपैकी एका रोपवाटिकेचा लोकार्पण सोहळा पिंगुळी, कुडाळ येथे संपन्न झाला. रोपवाटिकेचे उद्घाटन डॉ. सतीश नारखेडे, सहयोगी अधिष्ठाता, वनशास्त्र महाविद्यालय यांच्याहस्ते डॉ. पराग हळदणकर, सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळंदे व आर. जी. फाटक, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी वनशास्त्र महाविद्यालयाचे डॉ. अजय राणे, व्ही. एम. म्हस्के, डी. एच. पाटील व शेतकरी उपस्थित होते. याबद्दल डॉ. तपस भट्टाचार्य, कुलगुरू आणि डॉ. उत्तम महाडकर यांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Manga bamboo planting in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.