तालुकास्तरीय भातपीक स्पर्धेत मंगेश साळवी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:01+5:302021-07-11T04:22:01+5:30
पावस : रत्नागिरी जिल्हा कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या तालुकास्तरीय भातपीक स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे शेतकरी व पंचायत समितीचे ...
पावस : रत्नागिरी जिल्हा कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या तालुकास्तरीय भातपीक स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे शेतकरी व पंचायत समितीचे माजी सभापती मंगेश शंकर साळवी यांना सन २०२० या आर्थिक वर्षातील भातपीक स्पर्धेत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.
त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व भात शेतीचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी, त्यांना भात क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी, याकरिता तालुकास्तरीय भातपीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मंगेश साळवी यांनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे आपल्या क्षेत्रामध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाप्रमाणे भात पेरणीपासून ते भात काढणीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली. तसेच लागवड केलेल्या क्षेत्रामधून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याचा अभ्यास करून त्या क्षेत्रामध्ये मेहनत घेतली होती.
या स्पर्धेत भाग घेताना स्पर्धेचे नियम व अटी यांची योग्य ती सांगड घालून आपल्या प्रक्षेत्रामध्ये फक्त स्पर्धेसाठी लागवडीचे उद्दिष्ट न ठेवता प्रत्यक्षात उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न साळवी यांनी केले हाेते. या स्पर्धेत मंगेश साळवी यांना तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.