आंबा झाला दुर्लभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:34 AM2021-04-23T04:34:18+5:302021-04-23T04:34:18+5:30
रत्नागिरी : आंब्याचा पहिला हंगाम संपत आला असला, तरीही अजूनही स्थानिकांना आंब्याचा म्हणावा तितका आस्वाद घेता आला नाही. स्थानिक ...
रत्नागिरी : आंब्याचा पहिला हंगाम संपत आला असला, तरीही अजूनही स्थानिकांना आंब्याचा म्हणावा तितका आस्वाद घेता आला नाही. स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक वाढलेली दिसत नाही. त्यामुळे सध्या स्थानिकांना आंबा दुर्लभ झाला आहे.
एकांकिकेला पारितोषिक
रत्नागिरी : येथील नवोदित लेखक अमोल पालये यांच्या ‘पहिली रात्र’ या एकांकिकेला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. मुंबईत संवाद सेवा संस्थेच्यावतीने ही राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली होती. यापूर्वीही पालये यांच्या लेखनाला विविध पुरस्कार मिळाले आहेत.
पाणीटंचाई तीव्र
लांजा : तालुक्यातील कोचरी भोजवाडीतील पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्र होऊ लागली आहे. मात्र याकडे सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे. या ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. येथील धनगरवाडी आणि भोजवाडीतील ग्रामस्थांनी पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.
नागरिकांना प्रवेशबंदी
रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात सदैव नागरिकांची वर्दळ सुरू असते. मात्र सध्या कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. निगेटिव्ह चाचणी असलेल्यांनाच या कार्यालयात प्रवेश मिळेल, अशी सूचना या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.
रुग्णवाहिकेची मागणी
देवरुख : तालुक्यातील वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने अनेकवेळा गंभीर प्रसंग उद्भवतो. या परिसरात अपघात घडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रात तात्काळ २४ तास उपलब्ध असलेली रुग्णवाहिका आणि चालक उपलब्ध करून देण्याची मागणी गावविकास समितीने जिल्हा प्रशासनाला केली आहे.
मंदिर कमानीचे भूमिपूजन
खेड : असगणी येथील महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानी कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी सरपंच अनंत मायनाक, माजी सरपंच श्रीकांत फडकले, गंगाराम इप्ते, संजय बुरटे, बंडू आंब्रे आदी उपस्थित होते. मनसेचे कामगार सरचिटणीस संदीप फडकले यांच्या माध्यमातून ही कमान उभारण्यात आली आहे.
पगार रखडले
रत्नागिरी : जिल्ह्यातील ४३ माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोकण विभागातील जिल्ह्यांना आवश्यक वेतन अनुदानही अद्याप मिळालेले नाही.
उद्रेक वाढला
देवरुख : सध्या संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच आरोग्य यंत्रणेत अपुरे मनुष्यबळ असल्याने या यंत्रणेलाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.
उन्हाचा पारा चढतोय
मंडणगड : एप्रिल महिना संपत आला असल्याने आता उष्म्याची तीव्रता अधिक वाढू लागली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊन सुरू असतानाच आता उष्माही मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. सामान्य नागरिक घरात असले, तरी आरोग्य यंत्रणा, शासकीय तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बाहेर फिरत असल्याने त्यांना उन्हाचा त्रास होऊ लागला आहे.
कोरोना अहवालाला विलंब
रत्नागिरी : कोरोनाच्या आरटीपीसीआर तसेच अॅन्टिजेन चाचण्या सध्या सुरू झाल्या आहेत. काही आस्थापना तसेच शासकीय कार्यालयांकरिता कोरोना चाचण्या सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र त्या तुलनेत चाचण्यांसाठी असलेली यंत्रे कमी असल्याने या चाचण्यांचे अहवाल येण्यास विलंब होत आहे.