खाडीपट्ट्यात आंबा बागायतदार उदध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:33 AM2021-05-20T04:33:30+5:302021-05-20T04:33:30+5:30
खेड: खाडीपट्यात तौक्ते चक्रीवादळामुळे आंबा बागायतदार पूर्णपणे उदध्वस्त झाला आहे. येथील अनेक घरांवर झाडे कोसळून घरांचे नुकसान देखील झाले ...
खेड: खाडीपट्यात तौक्ते चक्रीवादळामुळे आंबा बागायतदार पूर्णपणे उदध्वस्त झाला आहे. येथील अनेक घरांवर झाडे कोसळून घरांचे नुकसान देखील झाले आहे. खाडीपट्ट्यातील सुसेरी, कोरेगाव, संगलट, शिर्शी, मुंबके, पन्हाळजे यासह सुमारे १३ गावांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. त्यात बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
खाडीपट्टा विभागात शेकडो आंबा बागायतदारांच्या बागेतील हजारो कलमी आंब्यांच्या झाडावरील काढणीला आलेले आंबे तौक्ती चक्रीवादळाने जमीनदोस्त केले. वादळात पडलेल्या व पावसात भिजलेल्या आंब्यांचा कॅनिंगशिवाय काहीही उपयोग नाही. शेतकऱ्यांनी जेवढे जमतील तेवढे आंबे गोळा केले आहेत. मात्र पडलेल्या आंब्यांना कोणीही भाव देत नाही अथवा कोणीही व्यापारी विकत घेत नाही. वर्षभर केलेल्या मेहनतीवर व लाखो रुपये खर्चावर तौक्ते चक्रीवादळाने आणि अवकाळी वादळी पावसाने अक्षरशः पाणी फिरवले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खाडीपट्टा येथील आंबा बागायतदार अकबर दुदुके, दाऊद हमदुले यांसह शेतकऱ्यांनी शासनाने याबाबत संवेदनशील विचार करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षात झालेल्या वादळांमुळे वडिलोपार्जित सत्तर ते ऐंशी वर्षे जुन्या हापूस आंबा बागायती निम्म्यापेक्षा जास्त नष्ट झाल्या आहेत. शासनाने नुकसानग्रस्त बागायतदारांना नवीन लागवडीसाठी विशेष अनुदान देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.--
भरपाई नाही, विमाही नाही
गेल्यावर्षीच निसर्ग चक्रीवादळ झाले, त्यावेळीही खाडीपट्ट्यात मोठी हानी झाली. तेव्हा नुकसान भरपाई मिळाली. मात्र काही जण अजूनही त्यापासून वंचित आहेत. पीक विमा काढूनसुद्धा विम्याची रक्कम गेल्या वर्षभरापासून आम्हाला मिळाली नाही. शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अत्यंत तोकडी असून, झालेल्या खर्चाच्या पाच टक्के देखील नुकसानीची भरपाई होत नाही. तरी शासनाने योग्य दरात नुकसान भरपाई द्यावी आणि कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आंबा बागायतदार अकबर दुदुके यांनी केली आहे.
चौकट २
वादळात झालेल्या नुकसानीचे लवकर पंचनामे करा : आ. योगेश कदम
वादळात झालेल्या घरांच्या, गोठ्याच्या, आंबा बागांसह शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या सूचना आमदार योगेश कदम यांनी तौक्ते चक्रीवादळ झाल्यानंतर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
--
khed-photo191
खेड: तालुक्यातील खाडीपट्ट्यात आंबा बागांमध्ये झालेले नुकसान.
--