उष्मा वाढल्याने आंबा बागायतदार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:29 AM2021-03-28T04:29:51+5:302021-03-28T04:29:51+5:30

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांत वाढलेला उष्मा असह्य झाला आहे. जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. अतिउष्म्यामुळे आंब्यावर काळे डाग ...

Mango growers worried over rising temperatures | उष्मा वाढल्याने आंबा बागायतदार चिंतेत

उष्मा वाढल्याने आंबा बागायतदार चिंतेत

Next

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांत वाढलेला उष्मा असह्य झाला आहे. जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. अतिउष्म्यामुळे आंब्यावर काळे डाग पडू लागले असून फळांची गळही वाढली आहे. आधीच आंबा उत्पादन कमी असतानाच उष्म्यामुळे उरलेसुरले आंबा पीक धोक्यात आल्याने बागायतदार चिंतेत सापडले आहेत.

हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन कमी आहे. जेमतेम १० ते १५ टक्के आंबा असताना अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. शिवाय, आता उच्चतम तापमान यामुळे पीक पुन्हा धोक्यात आले आहे. त्यामुळे फळपीक विमा योजनेंतर्गत बदलत्या तापमानाची नोंद घेत शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याची आवश्यकता आहे.

यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे पालवीचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, ऑक्टोबरमध्ये आलेला मोहोराचे रक्षण जे शेतकरी करू शकले, त्यांचा आंबा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत बाजारात आला. मात्र, फेब्रुवारीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंब्याचे नुकसान झाले. गारा पडून आंबा बाद झाला. फळावर काळे डाग पडले, काही ठिकाणी तो गळूनही गेला. त्यातच गेल्या चार दिवसांत उष्णतेची लाट कोकणात आली असल्याने त्याचा परिणाम आंब्यावर होऊ लागला आहे.

उष्मा वाढल्याने झाडांना पाणी देण्याची सूचना कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना केली जात असली, तरी डोंगराळ भागात पाणी वाहतूक करणे अशक्य असून खर्चही परवडेनासा झाला आहे. कातळावरील बागांना वाढत्या उष्म्याचा जास्त फटका बसत आहे. भाजलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत प्रचंड खर्च करावा लागतो. मात्र, त्या तुलनेत दर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना खर्च भरून काढणे अवघड बनले आहे.

............................

दरवर्षी आंबा पीक धोक्यात येत आहे. बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम याबाबत कृषी विद्यापीठाकडून संशोधन होणे गरजेचे आहे. यावर्षी अवेळीचा पाऊस, गारपीट व आता वाढत्या उष्म्यामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे. याबाबत विमा कंपनीकडून दखल घेणे गरजेचे असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

- राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी

Web Title: Mango growers worried over rising temperatures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.