रत्नागिरीत मँगो, मरीन पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
By रहिम दलाल | Published: September 4, 2022 05:22 PM2022-09-04T17:22:05+5:302022-09-04T17:23:25+5:30
राज्यातील सांगली अकोला, संभाजीनगर, भिवंडी, पुणे येथेही लॉजिस्टिक पार्क करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
रत्नागिरी : राज्यात ५ लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरीतही लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून त्याच्याच शेजारी मंगो आणि मरीन पार्कही उभारण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग विभागाने घेतला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील सांगली अकोला, संभाजीनगर, भिवंडी, पुणे येथेही लॉजिस्टिक पार्क करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रत्नागिरीतही हे पार्क उभरण्यात येणार असून त्यासाठी लागणारी जागा एमआयडीसीमार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाबरोबर कशा पद्धतीनं टायअप करायचे आहे, याबाबत चर्चा सुरु आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली.
लॉजिस्टिक पार्क आणि मँगो. मरीन पार्क यांना उद्योग विभागाकडून तत्वतः मान्यता दिल्याचेही उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. आंबा, काजू, मासे हे मुंबईच्या जेएनपीटी बंदरातून एक्सपोर्ट करतो. मात्र, जयगड किनाऱ्यावर तीन इंटरनॅशनल जेट्टी आहेत. येथून परवानगी मिळाल्यास आपल्याला कंटेनर एक्सपोर्ट करण्यासाठी जेएनपीटीला जाण्याची आवश्यकता नाही. ते जयगड बंदरातूनच एक्सपोर्ट करता येतील, असेही त्यांनी सांगितले.