आंबा हंगाम अंतिम टप्यात : दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:33 AM2021-05-11T04:33:13+5:302021-05-11T04:33:13+5:30
रत्नागिरी : आधीच लहरी वातावरणाचा बसलेला फटका, त्यातच काेराेनामुळे आलेले निर्बंध यामुळे आंबा बागायतदार समस्यांच्या गर्तेत सापडलेले आहेत़ त्यातून ...
रत्नागिरी : आधीच लहरी वातावरणाचा बसलेला फटका, त्यातच काेराेनामुळे आलेले निर्बंध यामुळे आंबा बागायतदार समस्यांच्या गर्तेत सापडलेले आहेत़ त्यातून आंबा हंगाम सुरू झाल्यानंतर अवकाळी पावसाचा फटका बसला़ त्यामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी आले़ आता आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे़ आंबा हंगाम संपत आल्याने दरात काहीशी घट करण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे़
‘निसर्ग’ चक्रीवादळासह बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा हंगामावर झाला. पावसाळा लांबला मात्र त्यातुलनेत थंडी गायब राहिली त्यामुळे फुलोरा फारसा झाला नाही. जेमतेम १५ ते २० टक्केच पीक उत्पादन शेतकऱ्यांना लाभले. मार्चपासून आंबा बाजारात आला़ मात्र त्याचे प्रमाण कमी राहिले. उत्पादन कमी असल्याने सुरुवातीला दर टिकून होते. पण आवक वाढल्याने दर कमी झाले असून, सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा आस्वाद घेता येणार आहे. हजार ते पंधराशे रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.यावर्षी आंबा हंगाम दोन टप्प्यात राहिला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा दि. १५ मेपर्यंत संपणार आहे. गेल्या २५ ते ३० वर्षात प्रथमच एवढ्या लवकर आंबा हंगाम संपणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंबा दि. २५ मे नंतर सुरू होऊन दि. १० जूनपर्यंत संपणार आहे. सध्या हा आंबा कोवळा आहे. शिवाय पावसाने तारले तर हा आंबा शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे. मात्र, हा आंबा फारच कमी असून निवडक शेतकऱ्यांनी विशेष फवारणी करून आंबा वाचविला आहे. जेमतेम पाच ते सात टक्के शेतकऱ्यांकडेच शेवटच्या टप्प्यातील आंबा उपलब्ध आहे.
यावर्षी आंबा हंगाम अत्यल्प राहिल्याने शेतकऱ्यांचा खत व्यवस्थापनापासून बाजारपेठेत पाठवेपर्यंत येणारा खर्च वसूल होणे अवघड झाले आहे. कोरोनामुळे वाशी बाजारसमितीमध्ये आंबा विक्री सुरू आहे. मात्र त्या तुलनेत दर नाहीत. त्यामुळे खासगी विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. जाग्यावर पंधराशे ते दोन हजार रूपये दराने आंबा पेटी खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी जाग्यावरच विक्री करीत आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च, हमाली वाचत आहे. चांगला आंबा वर्गवारी करून शेतकरी विक्रीसाठी पाठवित असले तरी उर्वरित आकाराने लहान फळ तसेच डाग असलेले फळ बाजारात विक्रीसाठी चालत नाहीत. त्यामुळे शेतकरी आंबा किलोवर घालत आहे. २८ रुपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे. आंब्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
----------------------------
यावर्षीचा एकूणच आंबा हंगाम निराशाजनक राहिला आहे. उत्पादन अत्यल्प राहिले. हवामानातील बदलामुळे आंबा पीक वाचविण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले. त्यातुलनेत दरही समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. काही निवडक शेतकऱ्यांकडे शेवटचा आंबा आहे. मात्र तो काढण्यासाठी अजून १५ ते २० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- राजन कदम, आंबा बागायतदार, रत्नागिरी.