आंबा हंगाम लांबणार, हवामान बदलाचा आंबा- काजू पिकावर परिणाम
By मेहरून नाकाडे | Published: December 9, 2023 02:27 PM2023-12-09T14:27:23+5:302023-12-09T14:27:47+5:30
बागायतदारांना पिकासाठी प्रतिक्षा करावी लागणार
रत्नागिरी : मधूर स्वाद व अविट गोडीने देशातीलच नव्हे तर परदेशी नागरिकांनाही भूरळ घातलेला हापूस आंबा उत्पादन यावर्षी हंगामापूर्वी होईल अशी अपेक्षा हवामानातील बदलाने फोल ठरवली आहे. आॅक्टोबर हीट चांगली जाणवली, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीही सुरू झाली. त्यामुळे आंबा कलमांना मोहर सुरू झाल्याने बागायतदारही सुखावले होते. परंतु नोव्हेंबरच्या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात पुन्हा बदल झाला.
थंडीच गायब झाली. त्यामुळे मोहर प्रक्रिया थांबली. पालवीचे प्रमाण वाढले असून यावर्षी आंबा हंगाम लांबणार असल्याची शक्यता आहे. परिणामी बागायतदारही धास्तावले आहेत. ढगाळ हवामान, थंडी गायब यामुळे कीड रोग, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होत आहे.
रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा जाहीर झाला व फलोत्पादन लागवडीला चालना मिळाली. जिल्ह्यात १७५३०५ हेक्टर क्षेत्रावर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. आंबा व काजू ही दोन पिके जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारी आहेत. आंबा व काजू पिकाला सुरूवातीच्या टप्प्यात मोहर सुरू झाला मात्र मध्येच थांबला आहे. एकूण मोहर प्रक्रिया जेमतेम १५ टक्केच आहे. अवकाळी पावसानंतर हवेतील उष्मा वाढला व थंडी गायब झाली.
ठिकठिकाणी पाऊस झाला. ढगाळ हवामानामुळे बुरशी, कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्सचे प्रमाण वाढले. पहिल्या टप्प्यातील मोहराला फळधारणा झाली असून पिक वाचविण्यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहेत. निसर्गाच्या दृष्टचक्रातून पिक वाचल्यास आंबा मार्चच्या पहिल्या टप्प्यात विक्रीला येईल. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असेल. सध्या पालवीचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होवून मोहर येण्यासाठी सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी लागतो.
त्यामुळे जानेवारीतच पालवी असलेल्या झाडांना मोहोर येणार आहे. त्यामुळे फळधारणा होवून आंबा एप्रिल-मे मध्येच येण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये हुडहुडी भरणारी थंडी होईल अशी अपेक्षा होती मात्र थंडीच गायब असल्याने मोहर कसा येणार? हवामानावर आधारित आंबा, काजू पिक असल्याने बागायतदारांना पिकासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.