लाॅकडाऊन काळातही आंबा वाहतूक सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:30+5:302021-04-18T04:31:30+5:30
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता अत्यावश्यक सेवांनाही निर्बंध लागू झाले आहेत. त्यातून आंबा वगळण्यात आल्याने ...
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता अत्यावश्यक सेवांनाही निर्बंध लागू झाले आहेत. त्यातून आंबा वगळण्यात आल्याने कडक निर्बंधातही आंबा वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्यातही वाशी बाजारात आंब्याच्या खरेदीविक्रीच्या वेळा निश्चित करण्यात आल्याने त्यालाही सुसूत्रता आली आहे. त्याच वेळी बागायतदारांनी आंब्याच्या थेट विक्रीवर भर दिला असून, ती वाहतूकही सुरळीत आहे.
हापूसच्या विक्रीसाठी बहुतांश शेतकरी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवलंबून आहेत. गतवर्षी लाॅकडाऊन काळात वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने खरेदी विक्रीचे व्यवसाय ठप्प होते. शेतकऱ्यांना खासगी विक्री करावी लागली. या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदीविक्री व्यवस्था करताना गर्दी टाळण्यासाठी दोन सत्रांत विभागणी केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनाही तशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे सकाळी सात वाजेपर्यंत वाशी मार्केटमध्ये पोहोचलेल्या वाहनातील आंब्याची विक्री सकाळी नऊ वाजता सुरू होते. सकाळी सातनंतर आलेल्या वाहनातील आंबा पेट्यांची विक्री दुपारनंतर होते. शेतकरीही त्याप्रमाणे नियोजन करून आंबा काढणी, पॅकिंग प्रक्रिया वेळेवर पूर्ण करीत आहेत.
गुढीपाडव्यापासून वाशी मार्केटमधील आवक वाढली आहे. दररोज ३४ ते ३५ हजार पेट्या विक्रीसाठी येत आहेत. आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. १,५०० ते ३,५०० रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.
आंबा नाशवंत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने आंबा काढणीसाठी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना कडक संचारबंदीतून वगळले आहे. गतवर्षीप्रमाणे शासकीय पासचे निर्बंधही हटविण्यात आले आहे. त्यामुळे गतवर्षाप्रमाणे यंदा बागायतदारांसमाेर समस्या नाहीत. कोरोनाचे संकट, शिवाय उत्पादन कमी असतानाही आंबा काढणी, विक्री, तसेच वाहतूक व्यवस्थेची समस्या तरी यंदा नाही.