देवस्थानच्या विश्वस्तांसह मानकरी कोविड तपासणीसाठी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:51+5:302021-03-21T04:29:51+5:30
चिपळूण तालुक्यातील वहाळ येथे देवस्थानच्या विश्वस्तांसह मानकऱ्यांची काेविड तपासणी सुरू करण्यात आली आहे. (छाया : संदीप बांद्रे) लाेकमत न्यूज ...
चिपळूण तालुक्यातील वहाळ येथे देवस्थानच्या विश्वस्तांसह मानकऱ्यांची काेविड तपासणी सुरू करण्यात आली आहे. (छाया : संदीप बांद्रे)
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोविड तपासणी बंधनकारक केल्याने विविध देवस्थानांचे विश्वस्त व मानकरी यांची त्यासाठी लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील वहाळ गावातील ग्रामदेवता श्रीदेवी वाघजाईच्या शिमगोत्सवासाठी तपासणी करण्यात आली. याशिवाय अन्य गावांतूनही तपासणीसाठी लगबग सुरू झाली आहे.
कोकणातील सर्वांच्या उत्सुकतेचा सण म्हणजे शिमगोत्सव मानला जातो. काही दिवसांवर हा सण आला असून त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ग्रामीण भागात तर यानिमित्ताने सजावट करून यात्रोत्सव साजरा केला जातो. परंतु, या वर्षी कोरोना परिस्थिती असल्याने शिमगोत्सवावर त्याचे सावट निर्माण झाले आहे. तसेच शासनाने शिमगोत्सव साजरा करण्यासाठी काही नियमावली निश्चित केली आहे. त्यामध्ये देवस्थानचे विश्वस्त व मानकरी यांना कोविड तपासणी प्राधान्याने करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय दर्शन व ओटी भरताना भाविकांसाठी काही नियमावली निश्चित केली आहे.
काही गावांमधील शिमगोत्सवानिमित्ताने भरणाऱ्या यात्रा रद्द केल्या असल्या तरी उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्यासाठी त्या-त्या गावात लगबग सुरू झाली आहे. शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणे वहाळची ग्रामदेवता श्रीदेवी वाघजाई देवस्थानच्या विश्वस्त व मानकरी मंडळींनी वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड तपासणी करून घेतली. त्यासाठी डॉ. मंदार आमने, डॉ. विजय सहस्रबुद्धे, आरोग्य सेविका रुख्मिणी पवार, श्रद्धा पवार यांनी ही तपासणी केली.