मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 04:11 PM2024-09-23T16:11:15+5:302024-09-23T16:25:49+5:30

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Manoj Jarange demand is right we support him Sharad Pawar reaction on maratha reservation | मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Sharad Pawar On Maratha Reservation ( Marathi News ) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीसह विरोधकांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांचीही कोंडी झालेली असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, पण इतर लहान समाजांनाही सोबत घ्यावं," अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे. ते रत्नागिरी इथं पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, "मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना समाजातील इतर लहान घटकांनाही सोबत घेतलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाचं एक वैशिष्ट्ये होतं की, हा समाज इतर जाती-जमातींना सोबत घेऊन जाणारा आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून बघितलं तरी अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य उभा करण्याचा आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला आहे आणि तीच भावना आजही समाजातील सर्व घटकांमध्ये आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे आणि ही मागणी करत असताना इतर समाजातील लोकांचा विचार करावा, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे. विशेषत: जरांगे पाटील यांनी स्वत:ही अशी भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितलं की धनगर, मुस्लीम, लिंगायत अशा इतर समाजालाही आरक्षण मिळावं. त्यामुळे सर्व लहान घटकांना सोबत घ्यावं, असं आमचं म्हणणं आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सरकार दरबारी हालचाली

मंत्रालयात आज मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. मंत्रालयात होणाऱ्या या बैठकीत हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारची कोंडी झाली असून विधानसभा निवडणुकीच्या आधी ही कोंडी फोडण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटियर  संदर्भात काही निर्णय होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

Web Title: Manoj Jarange demand is right we support him Sharad Pawar reaction on maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.