माणसातलं देवपण जपायला हवं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:30 AM2021-03-19T04:30:08+5:302021-03-19T04:30:08+5:30
मागीलवर्षी शिमगोत्सवाच्या मुखावर कोरोना दाखल झाला आणि अगदी घाईघाईने शिमगोत्सव आटाेपून चाकरमानी मुंबई-पुण्यात निघून गेले होते. मात्र, अजूनही कोरोनाची ...
मागीलवर्षी शिमगोत्सवाच्या मुखावर कोरोना दाखल झाला आणि अगदी घाईघाईने शिमगोत्सव आटाेपून चाकरमानी मुंबई-पुण्यात निघून गेले होते. मात्र, अजूनही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. उलट कोरोनाचा दुसरा टप्पा ऐन शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सक्रिय झाला आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर्षीही शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट कायम राहणार आहे.
कोकणात प्रत्येक भागात होळीची वेगवेगळी परंपरा आहे. वेगवेगळ्या चाली आहेत. मात्र, त्यामागे सर्वांची भावना एकच आहे. या भावनेची जपणूक करताना आजही परंपरेला फाटा न देता कोकणातील गावा-गावात होळी उत्सव साजरा केला जातो. होळी पौर्णिमेला मध्यरात्री होळी जाळणे, त्यानंतर साजरी केली जाणारी धुळवड आणि बाहेर पडणारी सोंगं... या क्रमानुसार जवळजवळ सर्वच ठिकाणी होळी साजरी केली जाते. मात्र, हे करताना त्या-त्या भागातील पद्धती वेगवेगळ्या आहेत. शिमगोत्सवानिमित्ताने काही ठिकाणी यात्रोत्सव, तर काही धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यानिमित्ताने होणाऱ्या गर्दीचा विचार करता, कोरोनाच्या परिस्थितीत खूपच घातक ठरणार आहे. या परिस्थितीचा काही ग्रामस्थ व देवस्थान कमिटी गांभीर्याने विचार करत आहेत. काहींनी तर शिमगोत्सव यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही गावातून कोरोनाचे नियम पाळून शिमगोत्सव साजरा करण्याचा विचार होताना दिसत आहे. सहाणेवर पालखी बसवून नारळ-ओट्या वाहण्याचा कार्यक्रम तेथेच करण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे. तसेच मोजक्याच लोकांकडून पालखीची ने-आण करण्यात येणार आहे. मात्र, त्याचवेळी काही गावांतून मानपान व रितीरिवाज आडवे येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने काही नियमावली ठरवून दिली असली, तरी काही ठिकाणी शिमगोत्सव म्हणजे गुंतागुंतीचा विषय बनला आहे. त्यातच शिमगोत्सव हा नाजूक व भावनिक विषय असल्याने त्यातून मार्ग काढणे कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनापेक्षा त्या-त्या गावच्या मानकरी व गावकर (वाडीप्रमुख) मंडळींनीच पुढाकार घेऊन अर्थात मानपान बाजूला ठेवून शिमगोत्सव शांततेत व सुरक्षितपणे होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा शेजारच्या गावात शिमगा होतो, मग आपल्या गावात का नाही, असा विचार पुढे आला, तर वर्षभर जीव धोक्यात घालून, कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांचे तसेच प्रशासनाचे कष्ट व्यर्थ जाणार आहेत. यावेळी पालखीतील देवाप्रमाणे समाजातील माणुसकीचा देवही प्रत्येकाला जपावा लागणार आहे. कोरोना हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे. तो टाळता येऊ शकत नसला तरी, माणसातील माणूसपण जपत त्यावर मात करता येऊ शकते, हेच शिमगोत्सवानिमित्ताने करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींचीही तितकीच जबाबदारी येते. बऱ्याचदा ‘तुम्ही करा कार्यक्रम, मी आहे तुमच्या पाठीशी’ असे बोलून मतांची गणिते बांधली जातात. चाकरमान्यांना खूश करण्यासाठी तर या गोष्टी शिमगोत्सवात घडतातच. परंतु ही वेळ ‘व्होटबँक’ची नव्हे, तर कोरोनाची आहे. तेव्हा लोकप्रतिनिधींनीही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.