मंडणगडात आकेशियाची कत्तल
By admin | Published: November 2, 2014 09:44 PM2014-11-02T21:44:32+5:302014-11-02T23:29:48+5:30
प्रशासन निद्रिस्त : लाकूडमाफियांचे बिनबोभाट राज
मंडणगड : रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या आकेशियाच्या तोडीला मंडणगडात रान मोकळे मिळाले आहे. प्रशासनही निद्रिस्त असल्याने लाकूडमाफियांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे सध्या मंडणगड तालुक्यात आकेशियाची बेसुमार कत्तल केली जात आहे.
सामाजिक वनीकरण विभागाने वनीकरण मोहीमेद्वारे ही आकेशियाची झाडे लावली होती. वनीकरण विभागाने ३० वर्षे मेहनत करुन ही झाडे मोठी केली. त्यामुळे तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुतर्फा आकेशियाची झाडे दाटीवाटीने उभी दिसतात. मात्र, या शासकीय झाडांवर लाकूडमाफियांची वक्रदृष्टी पडली आहे. सागाला पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकेशियाची बेसुमार कत्तल सुरु आहे. मोठ्या संख्येने आकेशियाची वृक्षलागवड करण्यात आल्याने हे झाड विनासायास उपलब्ध होत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आकेशियाची वृक्षलागवड सुरु आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभाग व सामाजिक वनीकरण विभाग परस्परांकडे बोटे दाखवण्यात मग्न असल्याने लाकूडमाफियांना रान मोकळे मिळाले आहे. या झाडांचा ताबा सध्या बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे जागा मालकाच्या पूर्वपरवानगीने वन विभाग वृक्ष तोडीचे परवाने संबंधितांना देऊ शकत नाही, हे उघड आहे. मात्र, तरीही तालुक्यात होत असलेली वृक्षतोड कशाच्या आधारावर सुरु आहे, असा सवाल केला जात आहे.
आंबडवे, पाथरळ, घोसाळे, पालवणी, बोरघर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आकेशियाची कत्तल होत आहे. वन खात्याने ही बाब आपल्या कार्यक्षेत्राबाहेरची असल्याचे सांगत हात झटकले आहेत. याबाबत तहसीलदार कविता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यापर्यंत याबाबत कोणतीच माहिती पोहोचली नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)