खत विक्रेत्यांनाही आता पॉस मशिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:05 PM2017-10-04T18:05:43+5:302017-10-04T18:09:43+5:30
खतविक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कृषी विभागातर्फे परवानाधारक खत विक्रेत्यांनाही पॉस मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राजापूर तालुक्यात २३ परवानाधारक खतविक्रेत्यांना तालुका कृषी विभागाच्यावतीने नुकतेच पास मशिनचे वितरण करण्यात आले आहे.
राजापूर, 4 : खतविक्रीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कृषी विभागातर्फे परवानाधारक खत विक्रेत्यांनाही पॉस मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राजापूर तालुक्यात २३ परवानाधारक खतविक्रेत्यांना तालुका कृषी विभागाच्यावतीने नुकतेच पास मशिनचे वितरण करण्यात आले आहे.
शेतीसह बागायतीच्या उत्पन्न वाढीसाठी आजकाल विविध खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राजापूर तालुक्यात शेतीबरोबरच बागायती क्षेत्रही मोठ्या प्रमाणात असून तालुक्यात वर्षभराच्या कालावधीमध्ये सुमारे ३ हजार ७०० मेट्रीक टन विविध प्रकारच्या खतांची खरेदी-विक्री होते.
या माध्यमातून सुमारे पाच कोटीहून अधिक आर्थिक उलाढाल होते. या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कृषी विभागाने आता परवानाधारक खतविक्रेत्यांना पॉस मशिन देण्याचा निर्णय घेतला आहे.
राजापूर तालुक्यात २३ परवानाधारक खत विक्रेते असून त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या पॉस मशिन काही दिवसांपूर्वी कृषी विभागाकडे उपलब्ध झाल्या होत्या. त्यानंतर आता संबंधित खतविक्रेत्यांना पॉस मशिनचे वाटपही करण्यात आले आहे. हे पॉस मशिन कसे वापरायचे याबाबतची माहिती व प्रशिक्षण खत विक्रेत्यांना यापूर्वीच देण्यात आले आहे. पॉस मशिनमुळे खत विक्रेत्यांना नेमक्या किती मेट्रीक टन खताची विक्री झाली, त्याची अधिकृत नोंद मिळणार आहे. त्यातच कार्डद्वारे स्वाईप करून पैसे स्वीकारले जाणार असल्याने खतविक्री आता कॅशलेस होणार आहे.