एकाच दगडात टिपले अनेक पक्षी

By admin | Published: March 7, 2017 12:02 AM2017-03-07T00:02:39+5:302017-03-07T00:02:39+5:30

सेनेची खेळी : जिल्हा परिषद अध्यक्ष निवड

Many birds in a single stone | एकाच दगडात टिपले अनेक पक्षी

एकाच दगडात टिपले अनेक पक्षी

Next



रत्नागिरी : रत्नागिरीचे सदस्य उदय बने यांना सेनेने जिल्हा परिषदेत गटनेतेपदी नियुक्ती दिल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी रत्नागिरी तालुक्यातून इच्छुक असलेल्यांचे पत्ते आपोआप कट झाले आहेत. यामुळे संगमेश्वर तालुक्यातील सेनेच्या रचना महाडिक यांचा अध्यक्ष बनण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. पुढील सव्वा वर्षासाठी लांजा तालुक्यातील सेनेच्या स्वरुपा साळवी यांना अध्यक्षपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सेना नेत्यांनी एका दगडात अनेक पक्षी टिपल्याची चर्चा आता रंगली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेला ५५ पैकी ३९ जागा मिळाल्या. सेनेला जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष कोणत्या तालुक्याचा होणार, कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याबाबत जिल्हावासीयांमध्ये प्रचंड उत्कंठा आहे. शिवसेनेतील विजयी उमेदवारांमध्ये या पदासाठी मोठी स्पर्धा आहे. रत्नागिरी तालुक्यात सेनेने जिल्हा परिषदेच्या सर्व दहा जागांवर विजय संपादन केला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यालाच हे पद मिळावे, यासाठी येथील काही नेत्यांकडून पक्षप्रमुखांकडे आग्रह धरण्यात येत आहे.
या पदासाठी रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य देवयानी झापडेकर, मानसी साळवी तसेच अन्य महिला सदस्यांची नावेही चर्चेत होती. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या सर्व ७ जागा जिंकणाऱ्या संगमेश्वर तालुक्याचाही या पदासाठी दावा होता. तेथील कसबा गटातून विजयी झालेल्या जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या पत्नी रचना महाडिक यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. निवडणुकीच्या आधीच तशी तयारी सेनेकडून करण्यात आली होती. कसबा गटात राजेश मुकादम यांनी सेनेत मोठे बंड करूनही ही जागा जीवाचे रान करून जिंकण्यात सेनेला यश आले.
मात्र, रत्नागिरी तालुक्यात सेनेने जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी तालुक्याला अध्यक्षपद मिळावे, यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली. मात्र, उदय बने यांची गटनेतेपदी निवड करून या मोर्चेबांधणीला सेनेच्या नेत्यांनी छेद दिला आहे. बने यांच्या पुढील काळातील अध्यक्ष बनण्याच्या महत्वाकांक्षेचे पंखही यामुळे कापले गेल्याची चर्चा आहे. या राजकीय खेळीमुळे पहिल्या अडीच वर्षासाठी रत्नागिरी तालुक्याला अध्यक्षपद मिळण्याची आशा मावळल्यात जमा आहे.
दक्षिण रत्नागिरीत शिवसेनेचे चांगले वर्चस्व असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्या तुलनेत उत्तर रत्नागिरीत अंतर्गत गटबाजीचा फटका सेनेला या निवडणुकीत बसला आहे. तरीही दापोली तालुक्यातील सेनेच्या जिल्हा परिषद सदस्य चारुता कामतेकर यांना अध्यक्षपद देण्याची राजकीय व्यूहरचना काही बड्या नेत्यांनी आखली आहे. मात्र, सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात तरी उत्तर रत्नागिरीचे अध्यक्षपदाचे स्वप्न साकार होण्याची शक्यता दुरावली आहे.
रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यांनंतर सर्वच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य विजयी करणाऱ्या लांजा तालुक्यालाही पुढील सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद दिले जाणाची शक्यता आहे. या पदासाठी सेनेच्या स्वरुपा साळवी यांचे नावही चर्चेत आहे. लांज्याला सव्वा वर्षे हे पद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Many birds in a single stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.