भाजपचे अनेक जण महाविकास आघाडीच्या संपर्कात, मंत्री उदय सामंतांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:42 PM2021-12-17T13:42:15+5:302021-12-17T13:43:53+5:30
चंद्रकांत पाटील यांनी मांडलेली भूमिका ही त्यांचे कार्यकर्ते साबित राहावेत यासाठी मांडलेली आहे.
रत्नागिरी : विरोधक आणि महाविकास आघाडीतील संघर्ष आता डोकाला गेला आहे. राज्यातील विविध प्रश्नावरुन विरोधकांनी आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. तर आघाडी सरकारमधील काही मंत्र्याकडून याला प्रत्युत्तर दिले जात आहे. विरोधकांकडून हे सरकार लवकरच कोसळणार असल्याची वेळोवेळी भाकिते केली जात आहेत. तर दुसरीकडे भाजपला पुढील ४० ते ५० वर्ष कोणी हरवू शकत नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री सामंत म्हणाले की, कोणी काय म्हणावे हा प्रत्येकाचा भाग आहे. कारण एका रात्री सरकार पडणार होत हे सगळ्यांना माहित आहे. चंद्रकांत पाटील यांनी मांडलेली भूमिका ही त्यांचे कार्यकर्ते साबित राहावेत यासाठी मांडलेली आहे. भाजपचे अनेक लोक शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या संपर्कात आहेत. हे कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, त्यांचा मॉरल वाढावा यासाठी पाटील यांनी हे वक्तव्य केले असावे, असा टोलाही सामंत यांनी लगावला.
मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध मुद्यावर आपले मत व्यक्त केले. केंद्र सरकारने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. याबाबतही सामंत यांनी शिवसेनेची काय भुमिका असणार आहे तेही स्पष्ट केले.