मिनी मंत्रालयात खातेप्रमुखांची अनेक पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:36+5:302021-09-21T04:34:36+5:30

रत्नागिरी : ग्रामीण भागाच्या विकासाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये खातेप्रमुखांची पदे रिक्त असून, त्यांचा पदभार प्रभारींकडे आहे. १४ ...

Many posts of department heads are vacant in the mini ministry | मिनी मंत्रालयात खातेप्रमुखांची अनेक पदे रिक्त

मिनी मंत्रालयात खातेप्रमुखांची अनेक पदे रिक्त

Next

रत्नागिरी : ग्रामीण भागाच्या विकासाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये खातेप्रमुखांची पदे रिक्त असून, त्यांचा पदभार प्रभारींकडे आहे. १४ पैकी १० खातेप्रमुखच नसल्याने मिनी मंत्रालयाचा कारभार हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जिल्हा परिषदेमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता आहे. अधिकारीच नसल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. जिल्हा परिषदेवर सध्या प्रभारींचे राज असल्याचे दिसून येते. अनेक खात्यांना गेले काही महिने खातेप्रमुखच नाही. प्रत्येक अधिकाऱ्याला किमान दोन-तीन खात्यांचा पदभार सांभाळावा लागत आहे.

शिक्षण विभाग तर खिळखिळा झाला आहे. प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकाऱ्याचे पद दोन वर्षे रिक्त असताना त्यांच्याच बरोबरीने उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या दोन्ही पदांवर गेली तीन - चार वर्षे विस्तार अधिकारीच काम करीत आहेत.

गेले सहा महिने ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी हे पदही रिक्त आहे. जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींवर प्रभारी अधिकाऱ्यांकडून अंकुश ठेवला जात आहे.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी, तसेच सहाय्यक लेखा व वित्त अधिकारी ही पदेही रिक्त असल्याने जिल्हा परिषदेचा आर्थिक भार सांभाळणाऱ्या वित्त विभागाची परिस्थितीही अधिकारी नसल्यासारखीच झाली आहे. हे दोन्ही अधिकारी दोन महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झाल्याने आता प्रभारींच्या हाती कारभार आहे. समाजकल्याण विभागात शिक्षण विभागाप्रमाणेच गेली दोन वर्षे खातेप्रमुखच नाही. त्याचा कारभार पशुसंवर्धन विभागाकडून सुमारे वर्षभर चालविला जात होता. महिनाभरापूर्वी जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची बदली उस्मानाबादला झाली. त्यामुळे पशुसंवर्धन आणि समाजकल्याण हे दोन्ही विभाग वाऱ्यावरच आहेत.

जिल्हा परिषदेच्या चिपळूण आणि रत्नागिरी या दोन्ही बांधकाम विभागात कार्यकारी अभियंतेच नाहीत. या पदावर चिपळूण आणि राजापूर बांधकाम विभागाचे शाखा अभियंते प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. एकीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था फार बिकट असून, वादळांमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक इमारतींची पडझड झालेली आहे. अशा स्थितीत या प्रभारींना तोंड द्यावे लागत असून, त्यांची दमछाक होत आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नुकतीच साताऱ्याला बदली झाली. जिल्हा परिषदेत रिक्त पदे असताना त्यांनी तत्काळ पद सोडले. त्यामुळे जिल्हा परिषद खिळखिळी झाली आहे.

रिक्त पदे

शिक्षणाधिकारी- १

उपशिक्षणाधिकारी- २

कार्यकारी अभियंते-२

उप मुख्य कार्यकारी अधिकारी- ३

जिल्हा समाजकल्याण अधिकारी-१

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी- १

मुख्य लेखा व वित्त अधिकारी- १

सहाय्यक मुख्य लेखा व वित्त अधिकारी- १

Web Title: Many posts of department heads are vacant in the mini ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.