‘त्या’ डांबर प्लॉटबाबत अनेक प्रश्न निरुत्तरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:25+5:302021-04-13T04:30:25+5:30
आवाशी : माणी (ता.खेड) येथे विनापरवाना सुरू असलेल्या डांबर प्लांटबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परवानगी नसतानाही ...
आवाशी : माणी (ता.खेड) येथे विनापरवाना सुरू असलेल्या डांबर प्लांटबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परवानगी नसतानाही हा प्लांट सुरू कसा झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एक-दाेन नव्हे, तर तब्बल २० वर्षे हा प्लांट सुरू राहूनही त्यावर काेणतीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
माणी (ता. खेड) येथील राहुल कन्स्ट्रक्शन कंपनीचा डांबर प्लॉट गेल्या वीस वर्षांपासून सुरू असून, त्यास कोणत्याही संबंधित विभागाची परवानगी नसल्याचे गावचे ग्रामस्थ बंटी आंब्रे व अशोक आंब्रे यांनी ही बाब उघड केली. याबाबत गावचे सरपंच राकेश शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, आजघडीला त्या कंपनीकडे कोणत्याही प्रकारच्या परवानगीचे पत्र उपलब्ध नाही. आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना पत्रव्यवहार करून पर्यावरण महामंडळ, आरोग्य विभाग वा ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र याबाबत विचारणा केली आहे. मात्र, त्यांच्याकडे यापैकी कोणतीही परवानगीचे पत्र उपलब्ध उपलब्ध नाही. त्यामुळेच तो प्लांट आता आम्ही बंद ठेवण्यास सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले, तर याच बाबींची काही कागदपत्रे यापूर्वीही कधी काळी उपलब्ध होती का, याची विचारणा ग्रामसेवकाकडे केली असता त्यांनी या प्रकरणावर सारवासारवीचे उत्तर देत बाजू मारुन नेण्याचा प्रयत्न केला.
जर हा प्लांट वीस वर्षापूर्वी सुरु झाला आहे तर त्यावेळी अस्तित्वात असणाऱ्या ग्रामपंचायत कमिटी व तत्कालीन ग्रामसेवक यांनी त्यास ना हरकत दिला आहे का? मात्र, प्लांट स्थापनेपासून आजपर्यंत त्या कंपनीला ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेच ठराव व त्या अनुषंगाने कमिटीने दिलेले ना हरकत पत्र असे कोणतेही कागदपत्र आजघडीला ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नसल्याचे सरपंच शिंदे यांचे म्हणणे आहे. जर ग्रामपंचायतीचेच ना हरकत प्रमपाणपत्र नसेल, तर मला आरोग्य खाते व प्रदूषण नियंत्रण मंडळ या खात्याची परवानगी मिळलीच कशी? हा प्रश्न मागील वीस वर्षांत माणी ग्रामपंचायतीची चार वेळा निवडणूक झाली. त्या त्या वेळेला नवनवीन सरपंच व सदस्यांना कार्यभार सांभाळला. मग त्यांनीही या कंपनीला याबाबत विचारणा का केली नाही, प्लांटची जागाही बिनशेती नसताना महसूल विभागानेही याकडे दुर्लक्ष केले. एवढे होऊनही या कंपनीने त्याच जागेत सध्या विनापरवाना १७ खोल्यांचे बांधकाम केले आहे. याच खोल्यांतून राहणारे कामगार याच गावात उघड्यावर व नदीत शौचास बसत आहेत. याबाबत गावचे ग्रामसेवक कोणती कारवाई करताना दिसत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, प्लांटला परवाना नसताना त्याच कंपनीने त्याच जागेत विनापरवाना खोल्या बांधाव्यात, याला याला कुणाचा आशीर्वाद, असा प्रश्न ग्रामस्थ करत आहेत.