पावसामुळे साखरपा परिसरातील अनेक मार्ग पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:19 AM2021-07-23T04:19:52+5:302021-07-23T04:19:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क साखरपा : मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्याला झाेडपून काढले असून, साखरपा, कोंडगाव परिसरासह आजूबाजूच्या गावांतील रस्ते पाण्याखाली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
साखरपा : मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्याला झाेडपून काढले असून, साखरपा, कोंडगाव परिसरासह आजूबाजूच्या गावांतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर कोंडगावमधील जगदीश राईन, नंदकुमार भोसले यांच्या घराला पाणी लागले आहे. काहींच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगात असून, परिसरातील अनेक भागांत पुराचे पाणी शिरले आहे. भडकंबा - भंडारवाडी, कोंडगाव- बौद्धवाडी, पुर्ये सीमा पुलाजवळील आणि साखरपा ग्रीन हाऊसजवळील काॅजवे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे त्या गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरून नुकसान झाले आहे. पूरस्थिती निर्माण हाेताच कोंडगावचे सरपंच बापू शेट्ये, कोंडगाव पोलीस पाटील मारुती शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी कोंडगावमधील परिस्थितीची पाहणी केली. या भागात आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.