अनेक सुरक्षा एजन्सीज विनापरवाना ?
By admin | Published: May 24, 2016 09:48 PM2016-05-24T21:48:03+5:302016-05-25T00:31:37+5:30
अनेक सुरक्षा एजन्सीज्ची पोलीस दप्तरी नोंद नसल्याचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे.
सुनील आंब्रे --आवाशी -खेड तालुक्यात लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत कार्यरत असणाऱ्या रासायनिक कंपन्यांसह अन्य कंपन्यांना सुरक्षा देणाऱ्या अनेक सुरक्षा एजन्सीज् परवानाधारक नसल्याची माहिती समोर येत आहे. यातील अनेक सुरक्षा एजन्सीज्ची पोलीस दप्तरी नोंद नसल्याचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लि. कंपनीत एका सुरक्षारक्षकाने केलेल्या गोळीबारात दोघेजण ठार झाले. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला. याबाबत ‘लोकमत’ने जिल्ह्यातील सुरक्षा एजन्सीज्बाबत पोलीस खात्याकडून माहिती घेतली होती. त्यानुसार जिल्ह्यात केवळ १४ कंपन्यांचे ५०० सुरक्षारक्षक परवानाधारक असल्याचे स्पष्ट झाले होते. अनेक सुरक्षा एजन्सीज् आपली नोंद स्थानिक पोलीस स्थानकांमध्ये करत नसल्याचा मुद्दा पुढे आला होता. मात्र, इतका मोठा प्रकार होऊनही उर्वरित एजन्सीज्बाबत माहिती घेण्याच्यादृष्टीने कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.
खेड तालुक्यातील लोटे-परशुराम या संवेदनशील व रासायनिक प्रकल्प असलेल्या परिसरातही अशीच स्थिती आहे. येथे असणाऱ्या सुरक्षा एजन्सीज्पैकी मे. सुर्वे ग्रुप, धामणदेवी, खेड या एकाच एजन्सीचे नाव परवानाधारकांच्या यादीमध्ये आहे. लोटे पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार केवळ १० एजन्सीजची नोंद लोटे पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आलेली आहे. या परिसरात आणखीही अनेक एजन्सीज् कार्यरत असून, उर्वरितांनी अद्याप माहिती सादर केलेली नाही. विशेष म्हणजे सुरक्षा एजन्सीज्सह कंपन्यांनी स्वत:ही याची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, कंपन्यांनीही याबाबत पुढाकार घेतला नसल्याचे दिसत आहे.