मोलकरणीचा दागिन्यांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:14 AM2017-07-31T00:14:38+5:302017-07-31T00:14:38+5:30
दूध पिशवी आणण्यास गेल्याची संधी साधून पाच मिनिटांतच कपाटातील रोख रक्कम व दागिने असा सव्वादोन लाखांचा ऐवज मोलकरणीने लंपास केल्याची घटना समोर आली आहे़ याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात दर्शना दीपक कदम (वय ३९, मच्छीमार्केट, रत्नागिरी) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी; अंजना दत्तात्रय गुणे (६३,एसटी स्टॅण्ड संघवीज टॉवर, रत्नागिरी) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत़ गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी घरातील कामासाठी १ जुलैपासून दर्शना कदम यांना ठेवले होते. १० जुलै रोजी तिच्या बहिणीचा मुलगा अनिरुध्द आठल्ये याच्याकडे त्याच्या मुलीचा वाढदिवस होता़ त्याचे आमंत्रण त्याने अंजना गुणे यांना दिले होते़ त्यामुळे अंजना यांनी दर्शना हिला दूध आणण्यास सांगितले़ परंतु दर्शना हिने मी कपडे धुऊन घेते़, तोपर्यंत तुम्हीच दूध पिशवी घेऊन या, असे सांगितले़ त्यामुळे त्या दूध आणण्यासाठी दुकानांत गेल्या. अवघ्या पाच मिनिटांतच दर्शना हिने डाव साधत कपाटातील ८ तोळे सोन्याचे दागिने व १० हजार रोख रक्कम असा सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास केला व ती पसार झाली. सायंकाळी ४च्या सुमारास अंजना यांनी दागिने काढण्यासाठी कपाट उघडले़ त्यावेळी त्यांचे दागिने दिसून आले नाही़ त्यामुळे त्यांनी तत्काळ याची माहिती भावाला दिली़ भावाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. परंतु अंजना गुणे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी रविवारी दर्शना कदम हिच्या विरोधात तक्रार दाखल केली़ त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़